विस्तार अधिकारी देवकाते यांचा सत्कार

प्रतिनिधी | खेड :  वेरळ ग्रामपंचायतींचे ग्रामविकास अधिकारी भास्कर देवकाते यांची पदोन्नतीने गुहागर पंचायत समितीच्या विस्तार अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच वैदेही घाडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील कशेडी, खवटी ग्रामपंचायतीपासून ग्रामसेवक म्हणून सेवेस प्रारंभ करणाऱ्या देवकाते यांनी तब्बल १९ वर्षे सेवा बजावली. सद्यस्थितीत ते वेरळ  ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहचवून त्याचा लाभ जनतेला मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते नेहमीच अग्रस्थानी होते.
त्यांच्या प्रशासकीय कामकाजाची दखल घेत त्यांना विस्तार अधिकारीपदी बढती देण्यात आली आहे. याप्रसंगी उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व कर्मचारी उपस्थित होते.