निवती किल्ल्यावर सोमवारी साजरा होणार मराठा आरमार दिन

Google search engine
Google search engine

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागच्या मावळ्यांचे आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी २४ ऑक्टोबर १६५७ रोजी भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती केली. या घटनेला ३६५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या कोकण विभागाच्यावतीने सोमवारी २४ ऑक्टोबर रोजी निवती किल्ल्यावर ‘मराठा आरमार दिन ‘ साजरा करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी २४ ऑक्टोबर १६५७ रोजी ऐन दिवाळीत धनत्रयोदशीला कल्याण – भिवंडी काबीज केली. तसेच मराठ्यांच्या नव्हे तर भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती या शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत झाली. या वर्षी या घटनेला ३६५ वर्षे पूर्ण होत आहेत. ही सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

या ऐतिहासिक दिनाची आणि आपल्या स्वराज्याच्या दैदीप्यमान, ज्वाज्वल्य किर्तीची आठवण म्हणून दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या कोकण विभागाच्यावतीने येत्या सोमवारी निवती किल्ल्यावर हा दिवस मराठा आरमार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यावेळी छत्रपती शिवरायांच्या या आरमारी दुर्गास मानवंदना देण्यात येणार आहे.

यासाठी शिवप्रेमी सोमवारी २४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता कुडाळ तालुक्यातील पिंगुळी म्हापसेकर तिठा येथून प्रस्थान करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ३ वाजता किल्ले निवती गडावर पोहचल्यानंतर किल्ल्याची स्वच्छता व सजावट करण्यात येणार आहे. त्यानंतर ४ वाजता महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरमार दलात काम केलेल्या मावळ्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. तर सायंकाळी ५ वाजता किल्ले भ्रमंती करून परतीचा प्रवास सुरु होणार आहे.

या मराठा आरमार दिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या शिवप्रेमींनी आपली नावे गणेश नाईक ९८६०२५२८२५ आणि प्रसाद सुतार यांच्याकडे नोंदवावीत असे असे आवाहन समीर धोंड आणि समिल नाईक यांनी केले आहे.

 

फोटो – निवती किल्ला

Sindhudurg