समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भोजे यांचे प्रतिपादन
रत्नागिरी | प्रतिनिधी : जिल्ह्यात राज्य सरकारी,निम-सरकारी शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा संप चर्चेअंती मागे घेण्यात आला आहे, असे संघटनेचे राज्य निमंत्रक विश्वास काटकर यांनी सांगितले आहे. यापुढेही सर्वच मागण्यांसाठी आमचे संघटन आग्रही आणि अग्रेसर राहील, अशी माहिती जिल्हा समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भोजे यांनी दिली आहे.जिल्ह्यात पुढील आठ दिवसांच्या संपाचे नियोजन पूर्ण झाले होते सोमवारी आमच्या आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीसह थाळी नाद केला. यामध्ये आंदोलनाची चांगलीच ताकद आम्हाला दाखवता आली. मात्र अचानक राज्य सरकारने चर्चेची तयारी दाखवली. तसेच जुनी पेन्शन योजना सामाजिक स्थैर्याच्या दृष्टीने तत्वतः मान्य केल्याने काही अटींवर संप मागे घेण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. यापुढे जिल्हा समन्वय समिती सर्वच कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास जिल्हा समन्वय समितीचे सचिव सागर पाटील यांनी दिला आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती संघटनेवर आपण सर्व सदस्यांनी, संघटनांनी दाखविलेला विश्वास हा अतिशय मोलाचा आहे, त्या विश्वासाला आम्ही यापुढेही तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन जिल्हा मध्यवर्ती संघटनेचे सचिव चंद्रकांत चौगुले यांनी सर्व संघटनाप्रमुख तसेच सदस्यांना दिले आहे. आपण लढवय्ये आहोत हे दाखवून दिले आहे. यापुढे हा लढा आणखी तीव्र करावा लागू नये, असा इशारा कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे यांनी दिला आहे.
कर्मचाऱ्यांची एकजूट ही या संपाची अतिशय मोठी जमेची बाजू होती, ही बाब शासनाने ओळखल्याने शासन अचानक चर्चेस तयार झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र जुन्या पेन्शन योजनेबाबत मात्र काही दगाफटका झाल्यास यापुढील आंदोलनात सत्ताधाऱ्यांना जोरदार झटका बसल्याशिवाय राहणार नाही, मग सत्ताधारी कोणत्याही पक्षाचे असोत, असा इशारा संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख प्रशांत जाधव यांनी दिला आहे.सर्व संघटनांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू पुन्हा संपाची बैठक घेण्याची किंवा संप करण्याची वेळ न येवो, अशी अपेक्षा समन्वय समितीचे कोषाध्यक्ष केदार कोरगावकर यांनी व्यक्त केली आहे. आम्ही लढलो आणि लढत राहू आम्हाला कमी समजू नये, असा समज वजा इशारा संघटनेचे सल्लागार दिनेश सिनकर यांनी दिला आहे .जुनी पेन्शन योजना हे आमचे ध्येय आहे ते जसेच्या तसे प्राप्त झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे दत्तात्रय क्षीरसागर यांनी म्हटले आहे. दरम्यान अजून थोडं ताणलं असतं तर अभ्यास समिती पण रद्द झाली असती थेट जुनी पेन्शन योजना आणि अन्य मागण्या मान्य झाल्या असत्या, अशी प्रतिक्रिया अनेक कर्मचारी व्यक्त करताना दिसत होते. सदर संपात 35 पेक्षा अधिक संघटनांनी सहभाग घेतल्याचे सांगण्यात येत आहे.