रत्नागिरी ग्राहक पेठच्या प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन

रत्नागिरी : महिला घरसंसार सांभाळून लघुउद्योग करत आहेत. महिलांना एकत्र आणून व्यासपीठ देण्याचे काम सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे करत आहेत. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला हव्यातच. पण त्यांच्या कलागुणांना संधी मिळणेही आवश्यक आहे, रत्नागिरीची बाजारपेठ चांगली आहे. त्यामुळे महिलांनी शेती करून त्यावर प्रक्रिया करून यशस्वी उद्योजिका बनावे, असे आवाहन चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. पूजा शेखर निकम यांनी केले.

रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे महिला दिन व गुढीपाडव्यानिमित्त आयोजित उद्योगिनी व महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू प्रदर्शनाचे उद्गाटन केल्यावर त्या बोलत होत्या. शांतीनगर येथील बालाजी मंगल कार्यालयात हे प्रदर्शन सुरू झाले. या वेळी माजी नगरसेविका शिल्पा सुर्वे, आहारतज्ज्ञ आणि नर्सरी व्यावसायिक कोमल तावडे, निवृत्त शिक्षिका सौ. शुभांगी इंदुलकर, शकुंतला झोरे उपस्थित होत्या. याप्रसंगी रत्नागिरी ग्राहक पेठच्या संचालिका प्राची शिंदे यांनी पूजा निकम यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन सौ. अनघा मगदुम यांनी केले.

प्राची शिंदे यांनी या प्रदर्शनाबद्दल माहिती देताना सांगितले की, सुरवातीला गेली अनेक वर्षे महिला बचत गटांना सोबत घेऊन प्रदर्शन आयोजित करत आहोत. या प्रदर्शनात येणाऱ्या महिला उद्योगिनी होतात. मालाची विक्री जास्त होण्यापेक्षा आपण माल कसा विकला पाहिजे, बाजारपेठेची माहिती, ग्राहकांशी संवाद तसेच अनेक मैत्रिणी मिळतात हे या प्रदर्शनाचे फायदे आहेत. अनेक महिलांनी या प्रदर्शनात भाग घेऊन स्वतः दुकानेही सुरू केली आणि आज यशस्वी उद्योगिनी झाल्या आहेत. जास्तीत जास्त महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत याकरिता लागणारे सर्व सहकार्य मी करत आहे.

येत्या २६ मार्चपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८.३० या वेळेत प्रदर्शन सुरू राहणार आहे. या प्रदर्शनादरम्यान महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात प्रश्नमंजुषा, स्पॉट गेम, २२ ला फनी गेम्स, २३ ला मोबाईल, संगणक, व्हिडिओ गेम्स यांच्या अतिरेकी वापरामुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम यावर मानसशास्त्रज्ञ सानिका कुंभवडेकर व कणाद क्लासेसच्या अक्षता इंदुलकर मार्गदर्शन करणार आहेत. २४ मार्चला एम. एस. नाईक फाउंडेशन संचलित कौटुंबिक सल्ला केंद्रामार्फत समुपदेशक श्री. नंदिवाले हे महिलांचे अधिकार व कायदे यावर मार्गदर्शन करतील. २५ मार्चला पाककला स्पर्धा आणि २६ ला सायंकाळी आंबेशेत, वायंगणकरवाडी येथील श्री साई सेवा महिला मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. शांतीनगर, नाचणे दशक्रोशीतील नागरिकांनी प्रदर्शनाला अवश्य भेट देऊन महिला बचत गटांच्या वस्तूंना प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्राची शिंदे यांनी केले आहे.