जालना : तोंडाला रूमाल बांधून आलेल्या सहा दरोडेखोरांनी तलाठ्याला मारहाण करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सहा लाख तीन हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना जालनामधील अंबड शहरातील यशवंतनगर येथे सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. यात तलाठी ईश्वरदास अर्जुनराव पावशे (३७) हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ईश्वरदास पावशे हे पत्नी व एका मुलीसोबत अंबड येथील यशवंतनगरात राहतात. सोमवारी ते झोपी गेले होते. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी हातात काठ्या घेऊन पावशे यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडले. त्याचवेळी ईश्वरदास पावशे यांना जाग आली. त्यांनी कोण आहे रे असे म्हणताच दरोडेखोरांनी काठीने त्यांना मारहाण केली. डोक्यात व डाव्या पायावर काठीने मारून जखमी केले.
त्यांच्या पत्नीला व मुलीला धाक दाखवून शांत राहण्यास सांगितले. नंतर कपाटाचे लोक तोडून चार लाख ५० हजार रोख व ५० हजारांचे सोन्याचे नेकलेस, ५० हजारांची पोत, २५ हजारांचे सोन्याचे झुंबर, २० हजारांची सोन्याची पोत व आठ हजारांचे डोरले आणि चांदीचे चैन असा एकूण सहा लाख तीन हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी ईश्वरदास पावशे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे करत आहेत.