महाडमध्ये ‘चवदार तळे सत्याग्रहा’ चा वर्धापनदिन उत्साहात साजरा

सरकारकडून यंदा प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सशस्‍त्र पोलिस मानवंदना

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाचा ९६ वा वर्धापनदिन सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. सरकारकडून यंदा प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सशस्‍त्र पोलिस मानवंदना देण्यात आली. यावेळी हजारो आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.

चवदार तळे सत्याग्रहाच्या स्मृतिदिनासाठी राज्यातील विविध भागातून हजारो भीमसैनिक दाखल झाले होते. ज्या पायऱ्यांवरून उतरून डॉ. आंबेडकरांनी चवदार तळ्यातील पाणी प्राशन केले, त्या पायऱ्यांवर उतरून येणारा प्रत्येक भीमसैनिक पाणी प्राशन करत सत्याग्रहाच्या आठवणी जागवत होता. हा सत्‍याग्रह केवळ पाण्यासाठी नाही तर मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे, अशा जाज्वल्य विचारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला चवदार तळे येथे २० मार्च १९२७ रोजी ऐतिहासिक सत्याग्रह केला. चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून डॉ. बाबासाहेबांनी दलित समाजाला गुलामगिरी व अस्पृश्‍यतेच्या अनिष्ट प्रथेतून मुक्त केले.

या क्रांतिदिनानिमित्त रविवारपासूनच चवदार तळ्यावर हजारोंचा जनसागर लोटला होता. चवदार तळे, दस्तुरी नाका व क्रांतिस्तंभ मार्ग येथेही भीमसैनिकांनी गर्दी केली. निळा, पांढरा पोशाख परिधान केलेल्या भीमसैनिक बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करत होते. भीम गर्जना व भीमगीतांनी सारा परिसर दुमदुमुन गेला होता. भीमसैनिक, विविध संघटना यांच्यामार्फत प्रभातफेरी, अभिवादन, सलामी असे कार्यक्रम करण्यात आले. विविध संघटनांच्या अभिवादन सभा या वेळी पार पडल्या. सोमवारी सकाळी दहा वाजता चवदार तळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर पोलिसांनी सशस्त्र मानवंदना दिली. यावेळी आमदार भरत गोगावले, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नरनवरे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद, मुख्याधिकारी महादेव रोडगे उपस्थित होते.