वाशी येथील तरूणाचा मृत्यू
देवरूख : देवरूख-रत्नागिरी मार्गावरील पूर फाट्यानजीक वळणावर दोन दुचाकींचा काल मंगळवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर अन्य दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. अवघड वळणाचा अंदाज न आल्याने दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाल्याचा अंदाज पोलीसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. संदेश सुभाष कदम (वय-४०, रा. वाशी कडूवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे या अपघातातील मृत तरूणाचे नाव आहे.
याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, संदेश कदम हे नरेंद्र गुणाजी पेंढारी यांना घेऊन दुचाकीने देवरुख-रत्नागिरी मार्गावरून वाशी या गावाकडे निघाले होते. दुपारी १२.३० च्या सुमारास पुर फाटा येथे आले असता वळणावर रत्नागिरीहून देवरूखच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती कि, संदेश कदम यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातामध्ये युवराज खोत व अविनाश जाधव गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर देवरुख रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघाताचा तपास देवरुख पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका विद्या पाटील करत आहेत.