हिंदू धर्माचे संस्कार, आदर्श, परंपरा जपुयात- प.पू. कानिफनाथ महाराज

Preserving the rites, ideals and traditions of Hinduism – H.P. Kanifnath Maharaj

नाणीज : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपण केलेला संकल्प, विचार पूर्णत्वाला जाणार आहे. म्हणूनच हिंदू धर्माचे संस्कार, परंपरा, विचारधारा, आदर्श असाच पुढे वाढवत ठेवू. सर्वांना प्रेम देऊ, चांगली वागणूक देऊ, आदर बाळगू, असा उपदेश प.पू. कानिफनाथ महाराज यांनी आज केला. आजच्या शुभदिनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे राज्यातील जिल्ह्यांच्या ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. त्यांनंतर गुढीपाडव्यानिमित्त राज्यभरातील भाविकांना एकाचवेळी ऑनलाईन मार्गदर्शन प.पू. कानिफनाथ महाराज यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते.

सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देवून कानिफनाथ महाराज पुढे म्हणाले,‘‘जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज आपल्याला नेहमी संदेश देतात की, ‘तुम्ही जगा, दुसर्‍याला जगवा.’ यामध्ये माणसाने माणसासारखे जगले पाहिजे. माणुसकीने जगावे. हाच विश्‍वाचा धर्म आहे. त्याचबरोबर आपल्या आवतीभोवतीचा निसर्गही जगवला पाहिजे. एकमेकांच्या विचाराचा आदर केला पाहिजे. आज जगामध्ये सर्वत्र अशांतता आहे. कारण आज माणूस माणसासारखा वागताना दिसत नाही. आम्ही एकमेकांची कमतरचा काढतो. एकमेंचे जातीमध्ये, धर्मामध्ये खच्चीकरण करत आहोत. आपणच कसे श्रेष्ठ आहोत असेच प्रत्येकाला वाटते. ही मंडळी युद्ध करतात. दुसर्‍याला वेठीस धरता. हिंदू ही उदार, विशाल हृदयाची संस्कृती आहे. आम्ही आमच्या महापुरूषांचा, देवदेवतांचा आदर करतो. आमच्या धमार्र्बरोबर प्रत्येक धर्माचा आदर करतो.’’

ते म्हणाले,‘‘नवीन वर्षात शांतता, आनंद, बंधुभाव, सकारात्मता वाढिला लागावी. सर्वांनी आनंदाने प्रपंच करीत इतरांना सहकार्य केले पाहिजे. हिंदूंनी आपल्या धार्मिक परंपरा, सण, उत्सव आणखी चांगल्या पद्धतीने साजरे केले पाहिजेत. हिंदू धर्मात ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना महत्वाची आहे. ज्याच्यामध्ये आपण सर्व परिवाराचा विचार करतो. त्याला समजून घेतो. विश्‍व हे कुटुंब आहे असे मानतो. त्याला शांतता लाभावी, आनंद लाभावा, सकारात्मक विचार वाढिला लागावेत, अशी आज प्रार्थना करुयात.’’प.पू. कानिफनाथ महाराजांचे प्रवचन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी भव्य शोभायात्रेनंतर पडद्यावर दाखवण्यात आले. रत्नागिरीत या प्रवचनाला चांगला प्रतिसाद मिळाला. शोभायात्रेतील सहभागी सर्वांना प्रवचनाबद्दल औत्सुक्य होते. सर्वांनी शांततेने हे प्रवचन ऐकले. त्यानंतर या सोहळ्याची सांगता झाली.