सांगलीची प्रतीक्षा बागडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी

Sangli’s Pratiksha Bagdi became the first woman Maharashtra Kesari

सांगली-महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सांगली येथे ही महिला कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सांगलीतील प्रतीक्षा बागडी आणि कल्याणमधील वैष्णवी पाटील यांच्यात अंतिम लढत झाली. या लढतीत प्रतीक्षा बागडीने वैष्णवी पाटीलला चितपट करत पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला आहे.

सांगली-मिरज रस्त्यावरील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये महिला महाराष्ट्र केसरी पदकासाठी कुस्ती स्पर्धा गुरूवारपासून सुरू होत्या. अंतिम सामन्यात तुंग (जि.सांगली) येथील बागडी आणि पाटील यांच्यात लढत झाली. आज सायंकाळी ही अंतिम लढत सुरू झाली. या अंतिम सामन्यात बागडी व पाटील मध्यंतरापर्यंत चार गुणांनी बरोबरीत होत्या. मात्र, मध्यंतरानंतर बागडीने पाटीलला चितपट करीत चार विरुध्द दहा गुणांनी महिला केसरी पदकावर मोहोर उमटवली

आज सकाळी झालेल्या उपांत्य सामन्यात बागडी हिने कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिचा ९ विरूध्द २ गुणांनी पराभव करीत अंतिम लढतीत प्रवेश केला होता. तर, दुसर्‍या कुस्तीमध्ये वैष्णवी पाटीलने वैष्णवी कुशाप्पाचा ११ विरूध्द १ अशा गुंणांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.