वेंगुर्ले | दाजी नाईक : उद्धव ठाकरे च्या शिवसेनेचे खासदार ५, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार ३ आणि राहुल गांधी यांच्या काँग्रेसचे खासदार ५० अशी एकूण ५८ बेरीज होते आणि एकट्या भारतीय जनता पार्टीचे खासदार ३०३ असं समीकरण असताना इंडिया आघाडी ३०० जागा जिंकेल असा दावा करतात. त्याला काही अर्थ नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी महायुतीतर्फे ४०० पार हा नारा देण्यात आला आहे. आणि सर्व भागातून मिळणारा पाठिंबा तसेच पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षात देशाच्या विकासासाठी केलेले काम पाहता महायुतीला हे शक्य आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पंतप्रधानांवर टीका करणारे आंबोलीच्या जंगलात वटवाघळा सारखे उलटे लटकताना दिसतील असा अप्रोधिक टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिरोडा येथे महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना लगावला. त्याचप्रमाणे वेंगुर्ले तालुका आपला आवडता तालुका आहे. या तालुक्यात एखादी युनिव्हर्सिटी आणण्याचा आपला मानस असल्याचेही यावेळी मंत्री राणे यांनी सांगितले.
शिरोडा येथील माऊली मंदिर सभागृहात महायुतीचा कार्यकर्ता मेळावा आज आयोजित केला होता. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजप चे संदीप कुडतरकर, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग राणे, आरवली सरपंच समिर कांबळी, सागरतिर्थ शेखर कुळव, उपसरपंच नमिता नागोळकर, तसेच बाळा दळवी, सुनिल डूबळे, सुनिल मोरजकर, दिलीप गीरप, योगेश तेली, शिवसेना महिला संघटक नीता कविटकर यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी महायुतीतर्फे मंत्री राणे व मंत्री केसरकर यांचा भव्य असा पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
मंत्री नारायण राणे पुढे म्हणाले की, गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या. ८० कोटी लोकांना मोफत धान्य वाटप झाले असून यापुढेही पाच वर्ष देणार आहेत, आयुष्यमान भारत ही योजना औषध उपचारासाठी आणली, पीएम आवास योजनेअंतर्गत साडेतीन कोटी गरिबांना घरे दिली, देशातील ११ कोटी ७२ लाख महिलांसाठी शौचालय बांधली, बारा कोटी लोकांना घरात नळ पाणी योजना दिली, शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला सहा हजार रुपये आले. ही विकासाची मोदी गॅरंटी आहे. जे जे सांगितलं तेथे करून दाखवले. मात्र आरोप करणाऱ्यांनी फक्त भ्रष्टाचार केला.
कोरोना काळात बंद पडलेल्या कारखान्यांना पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न
सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग खात्यातून कोरोना काळात बंद पडलेल्या देशातील कारखान्यांना पुनर्जीवित करण्यासाठी मोदी साहेबांनी ५ लाख ५० हजार कोटी रुपये बजेट मध्ये निधी दिला. त्यामुळे आता पुन्हा कारखाने उभे राहत आहेत. आजच्या तरुण-तरुणींनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायाकडे वळले पाहिजे. तसेच दर्जेदार शिक्षण घेऊन आयएस आयपीएस अधिकारी बनावे. यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. सिंधुदुर्गातील दोडामार्ग येथे ५०० कारखाने आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते आल्यावर येथील अनेकांना नोकरीची संधी मिळणार आहे. वेंगुर्ले तालुक्यातही युनिव्हर्सिटी आणण्याचा आपला मानस असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.
राणे पुढे म्हणाले की, मालवण मध्ये सी वर्ल्ड आणला तेव्हा शिवसेनेने विरोध केला, चीपी विमानतळासाठी जमिनी घेताना शिवसेनेनेच विरोध केला होता. मात्र प्रकल्पाच्या उद्घाटनाला आपणच प्रकल्प आणल्याचा अविर्भाव उद्धव ठाकरे दाखवत होते. रेडी बंदराच्या विकासासाठी चार हजार कोटी खर्च होणार आहे. हा प्रकल्प मी आणला मात्र विनायक राऊत यांचा मुलगा येथील मॅनेजमेंट ला त्रास देऊन पैसे उकळत आहे. असा आरोपही राणे यांनी केला. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असताना उद्धव ठाकरे केवळ दोन वेळा मंत्रालयात आले. अन्य दिवशी त्यांनी घरातूनच कारभार केला. यांनी विकासासाठी काही केले नाही. मराठी माणसाला सक्षम करण्यापेक्षा त्यांचे शोषणच केले असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांचा नारायण राणे यांनी घेतला समाचार
पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांचा नारायण राणे यांनी खरपूस समाचार घेतला. जगाच्या अर्थव्यवस्थेत अकराव्या स्थानावर असणारा आपला देश आज पाचव्या स्थानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणला. २०३० साली भारत जगाच्या तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे असे त्यांनी जाहीर केले आहे. विकसित भारत, निर्भय भारत बनविण्यासाठी मोदी साहेबांचे प्रयत्न आहेत. म्हणूनच अबकी बार ४०० पार हा नारा आहे. मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. म्हणूनच येत्या ७ मे रोजी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहन मंत्री राणे यांनी केले.
संजय राऊत यांनी अबकी बार मोदी हद्दपार असे म्हणून स्वतःचे हसे केले आहे. संजय राऊत तुझा अभ्यास नाही. वडीलधाऱ्या माणसांवर असं बोलणं सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही. तुला आणि तुझ्या मालकालाही त्यांच्यासारखं काम करणं जमणार नाही. तू सामनाचा कामगार आहेस हेच सत्य आहे. बाकी तू काही नाही.
मंत्री दीपक केसरकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, एवढे नेते व्यासपीठावर आहेत तर विजय महायुतीचा निश्चित आहे. देशाचा स्वाभिमान टिकवायचा असेल तर मोदी यांना मात दिल पहिजे. नारायण राणे साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा काया पालट करण्यासाठी अनेक वर्ष काम केले आणि करत आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करण्याची संधी आपणा सर्वांना लाभली आहे. त्याचा फायदा करूया असे आवाहनही मंत्री केसरकर यांनी केले.
यावेळी अन्य मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रितेश राऊळ यांनी तर सूत्रसंचालन व आभार काका सावंत यांनी मानले.