ग्रामपंचायत हर्णै येथे दिव्यांग मार्गदर्शन शिबीर

दापोली | प्रतिनिधी : तालुक्यातील हर्णै ग्रामपंचायत कार्यालयात दिव्यांग शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे मार्गदर्शन करण्यात आले. पाजपंढरीच्या विकलांग पुर्नवसन सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिलबुआ रघुवीर यांच्या माध्यमातून दिव्यांग मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले होते. यात रत्नागिरी हॅण्डीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे अध्यक्ष व संस्थापक सादिक नाकाडे, संस्थेचे सदस्य समीर नाकाडे, प्रिया बेर्डे, प्रितम कदम उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी विलास बैसल, ग्रामविकास अधिकारी कृष्णा साळुंखे, हर्णै सरपंच ऐश्वर्या धाडवे, उपसरपंच महेश पवार या वेळी प्रमुख उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र पावशे हे स्वत: अस्थिव्यंग असून हर्णै ग्रामपंचायतीत काम करतात. दिव्यांग ईरफान खान, ईब्राहीम काझी, रविंद्र मुकनाक उपस्थित होते.

या मेळाव्यामध्ये समीर नाकाडे यांनी दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र कसे काढावयाचे? त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत, युनिक आयडी कसे काढायचे, एसटीपास, रेल्वेपास काढण्याबद्दलची माहिती दिली. दिव्यांगांचे कायदे, ग्रामपंचायत ५ टक्के निधी, जिल्हा परिषद निधी, समाजकल्याण निधी, दिव्यांगांना शासनाकडून मिळणारी पेन्शन, कृत्रिम साधने याविषयी सखोल व परिपूर्ण माहिती दिली. अनिलबुवा रघुवीर महाराज यांनी दिव्यांगांबाबतचे बरेच प्रश्न विचारले. त्यांचे समाधानकारक निरसन सादीक नाकाडे यांनी केले. हर्णै परिसरातील जवळजवळ ४५ दिव्यांग बांधव आणि पालकांनी शिबीराचा लाभ घेतला.

ग्रामपंचायत हर्णै येथे दिव्यांग कामानिमित्त आला. त्याला येण्याजाण्याचा होणारा त्रास कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीने व्हीलचेअरची मागणी केली होती त्याप्रमाणे आरएचपी फाउंडेशनतर्फे ग्रामपंचायतीला नवीन एक व्हीलचेअर प्रदान करण्यात आली.