मसुरे | झुंजार पेडणेकर
महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत भात पीक उत्पादन वाढीसाठी घेण्यात आलेल्या खरीप २०२२ स्पर्धेत मालवण तालुक्यातून निरोम येथील विश्वास आचरेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कट्टा येथील सुधीर वराडकर द्वितीय, तर आंबाडोस येथील गोविंद धुरी यांनी तृतीय क्रमांक मिळविल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी दिली. महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मालवण यांच्यामार्फत कांदळगाव ग्रामपंचायत येथे भातपिकाचे मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी तालुकास्तरीय भात पीक उत्पादने स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचातालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कांदळगाव सरपंच रणजित परब, उपसरपंच श्रद्धा बागवे, एग्रीकार्ड शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक तथा प्रमुख मार्गदर्शक डॉ. सचिन चोरगे, संदीप धावले, कृषी पर्यवेक्षक धनंजय गावडे, “आत्मा” बीटीएम नीलेश गोसावी, कृषी सहाय्यक पवनकुमार सौंगडे तसेच शेतकरी वर्ग उपस्थित होते. तालुक्यात द्वितीय आलेले वराडकर यांनी सर्व अडचणींवर मात करत श्री पद्धतीने भात लागवड करत अधिक उत्पादन मिळविले.वराडकर हे कट्टा शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा माध्यमिक स्कूलचे शालेय समिती अध्यक्ष आहेत. त्यांनी विद्याथ्र्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान अवगत होण्यासाठी प्रशालेत कृषी विषयक चर्चासत्रे, प्रदर्शन आयोजित केली. याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.