रेतीने भरलेला डंपर रुतला होता गटारात; या गटाराकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष
पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे बांधकामासाठी रेती घेऊन आलेला डंपर गुहागर-विजापूर मार्गावरील शृंगारतळी बाजारपेठेत बांधलेल्या गटारात रुतला त्यामुळे या गटाराला मोठे भगदाड पडले.मात्र दोन महिने झाले तरी या गटारावर पडलेले भगदाड जैसे थे असल्याने अनेकांना याचा नाहक त्रास होत आहे.
दोन महिन्यापूर्वी शृंगारतळी बाजारपेठेत सुरु असलेल्या बांधकामासाठी आणलेल्या रेतीने भरलेला डम्परची मागची चाकं गटारात रुतल्याने शर्वरी प्लाझा समोर असलेल्या गटाराला मोठे भगदाड पडले आहे. या गटाराला बाजूने काहीही लावले नाही त्यामुळे या गटारामध्ये दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शृंगारतळी बाजारपेठेतील गटारे अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने गटार तुटुंब भरले आहे. याठिकाणी गटाराला भगदाड पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच डासही मोठ्या प्रमाणात त्रास देत आहे. त्यामुळे या गटारावर पडलेले भगदाड महामार्गाच्या ठेकेदाराने करावे असे येथील नागरीकांतून तसेच दुकानदारांतून बोलले जात आहे.