वेर्ले गावासह धवडकी पंचक्रोशीवर शोककळा
सांगेली । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील धवडकी येथील साईकृपा फोटो स्टुडिओचे मालक तथा प्रसिद्ध छायाचित्रकार प्रदीप कालवणकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे वेर्ले गावात शोककळा पसरली आहे.
प्रदीप कालवणकर हे फोटोग्राफीच्या माध्यमातून तालुक्यातील धवडकी सह माडखोल, सांगेली, कलंबिस्त, शिरशिंगे आदी गावात सर्वांच्या परिचयाचे होते. दै. प्रहारमध्येही त्यांनी काही काळ छायाचित्रकार तसेच ग्रामीण वार्ताहर म्हणून काम पाहिले होते.
शांत व मनमिळाऊ स्वभावाचे असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार दांडगा होता. परंतु ते गेल्या काही दिवसापासून हृदयविकाराने आजारी होते. त्यांच्यावर मुंबई येथे देखील उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यातून ते थोडेसे सावरले होते.
पण मंगळवारी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
Sindhudurg