वेंगुर्ला पत्रकार संघाच्या पुरस्काराचे उद्या २७ मार्च रोजी वितरण

वेंगुर्ला | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संलग्न वेंगुर्ला तालुका पत्रकार संघातर्फे पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दि. २७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता येथील रा.कृ.पाटकर हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, वेंगुर्ला निवडणुक नायब तहसिलदार संदिप पानमंद, वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मोहन भोई, वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजन खांडेकर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

यावेळी संजय मालवणकर कुटुंबिय पुरस्कृत कै. संजय मालवणकर स्मृती पुरस्कार प्रथमेश गुरव यांना, शशिकांत केसरकर कुटुंबिय पुरस्कृत कै. शशिकांत केसरकर स्मृती पुरस्कार अजय गडेकर यांना व अरुण काणेकर कुटुंबिय पुरस्कृत कै. अरुण काणेकर स्मृती पुरस्कार योगेश तांडेल यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तसेच यावेळी जिल्हा पत्रकार संघाचा ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त एस.एस.धुरी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत व सचिव अजित राऊळ यांनी केले आहे.