मुंबईच्या पोरीच हुश्शार !

डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामात ‘मुंबई इंडियन्स ‘ विजेते

मुंबई : डब्ल्यू पी एल च्या पहिल्या हंगामाच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर सात गडी राखून मात करीत मुंबई इंडियन्स संघाने विजेतेपद पटकावले. अतिशय रोमहर्षक झालेल्या या अंतिम सामन्यात नॅट स्किव्हर ब्रन्ट च्या जबाबदार अर्धशतकी खेळीच्या जीवावर अंतिम सामना जिंकत मुंबईने विजेतेपदाला गवसणी घातली.

मुंबईच्या ब्रॅबोन स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने मर्यादित २० षटकांमध्ये ९ गड्यांच्या मोबदल्यात १३१ धावा केल्या होत्या. दिल्ली संघाच्या फलंदाजांनी सुरुवातीला निराशा केली. १६ षटकांमध्ये दिल्ली संघाची ९ बाद ७९ अशी दयनीय अवस्था होती. मात्र, शेवटच्या चार षटकांत शिखा पांडे व राधा यादव यांनी तुफान फलंदाजी करीत तब्बल ५२ धावा करीत १३२ भावांचा आव्हानात्मक लक्ष ठेवलं.

प्रत्युत्तर दाखल फलंदाजी करताना मुंबईची देखील डळमळीत सुरुवात झाली. पावर प्ले च्या ६ षटकात मुंबई संघ २ गड्यांच्या मोबदल्यात केवळ २७ धावाचं जमवू शकला. त्यानंतर कप्तान हरमनप्रीत कौर व नॅट स्किव्हर ब्रन्ट यांनी सावध फलंदाजी करत सुरुवातीला डाव सावरला. त्यानंतर हरमनप्रित कौर धावबाद झाल्यानंतर मुंबई संघासमोर आव्हान काहीसे कठीण दिसत असतानाच मेली केरने ८ चेंडूत दोन चौकारांसह १४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर शेवटच्या एका षटकात विजयासाठी ५ धावांची आवश्यकता असताना अनुभवी नॅट स्किव्हर ब्रन्टने चौकार ठोकून विजयश्री खेचून आणली. तिने अतिशय महत्त्वपूर्ण अशी ५५ चेंडूत ६० धावांची मॅच विनिंग खेळी करून मुंबई संघाला विजयी करीत डब्ल्यू पी एल स्पर्धेचा प्रथम विजेता होण्यास महत्वपूर्ण योगदान दिले.

Mumbai