रत्नागिरी : श्रीरामनवमी निमित्त रत्नागिरीत ओम् साई मित्र मंडळातर्फे रविवार, २६ मार्चला सायंकाळी मंडळाच्या साळवी स्टॉप – नाचणे लिंक रोड वरील सभागृहात सामूहिक श्रीरामरक्षा पठण आणि श्रीरामनाम जप भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये सौ. दीप्ती आगाशे रामरक्षा स्तोत्र पठणाचे महत्त्व विशद करताना म्हणाल्या की, स्तोत्र’ म्हणजे देवतेचे स्तवन, म्हणजेच देवतेची स्तुती होय. स्तोत्रपठण केल्याने पठण करणार्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षककवच निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण होते. ज्या वेळी ठराविक लयीत अन् सुरात एखादे स्तोत्र म्हटले जाते, त्या वेळी त्या स्तोत्रातून एक विशिष्ट चैतन्यदायी शक्ती निर्माण होते. याकरता स्तोत्र एका विशिष्ट लयीत म्हणणे आवश्यक आहे. तसेच या स्तोत्रातील श्रीरामाच्या गुणांच्या वर्णनामुळे ते गुण आपल्यात येतात.
रामरक्षा स्तोत्राच्या नित्य पठणाने संकटापासून कसे रक्षण होते याची अनुभूतीही त्यांनी कथन केली.
वेदमूर्ती श्री. अवधूत मुळ्ये यांच्यासह उपस्थित भाविकांनी श्रीरामरक्षा स्तोत्राचे सामूहिक पठण केले. त्यानंतर ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामजपाचेही सामूहिक पठण करण्यात आले. सामूहिक पठणामुळे सभागृहातील वातावरण सात्विक, भक्तीमय झाल्याचा अनुभव अनेकांना आला.कार्यक्रमाची सांगता हिंदुराष्ट्र स्थापनेच्या प्रतिज्ञेने झाली. कार्यक्रमामध्ये मंडळाचे अध्यक्ष श्री. अनंत आगाशे, सर्वश्री अभिषेक मगदूम, शार्दूल मोरे, आर्यन सावंत, सुहास ठाकुरदेसाई, सौ. जया सामंत, सौ. किरण देवल-अमरावत, सौ. ऋता पंडित, सौ. शिल्पा सुर्वे, सौ. प्रिया लोवलेकर यांसह १०० भाविक सहभागी झाले होते. ओम साई मित्र मंडळाचे श्री. गौरांग आगाशे यांनी उपस्थितांचे आभार मानले.