खेड(प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील बचत गटातील महिलांना शासनामार्फत सवलतीच्या दरात शिलाई मशिनसह घरकुल देण्याचे आमिष दाखवत २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गजाआड करण्यात आलेल्या बबन मारुती मोहिते याची न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली.
महाराष्ट्र क्रांती सेना संस्थेच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना शासनाकडून महागडी हातशिलाई मशिन, घरकुल, घरघंटी व गोठा सवलतीच्या दरात देण्याचे आमिष दाखवत संदीप शंकर डोंगरे (वाराणी- कासार, बीड) व बबन मोहिते या दोघांनी तब्बल ९३८ महिलांची २३ लाख रुपयांची फसवणूक करत पोबारा केला होता. यातील मुख्य सूत्रधार संदीप डोंगरे याच्या यापूर्वीच शिताफीने मुसक्या आवळल्या होत्या.
गेल्या दहा महिन्यांपासून फरारी असलेल्या बबन मोहिते याच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने मुंबई येथून मुसक्या आवळत त्याला येथील पोलिसांच्या स्वाधीन केले होते. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्याच्या जामिनासाठी करण्यात आलेल्या अर्जावर सुनावणी झाली. अॅड. अश्विन भोसले यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली.













