दुर्दैव ! नोकरीच्या पहिल्याच दिवशी पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

पणजी : प्रतिनिधी

केरी – फोंडा येथे रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात पोलीस कॉन्स्टेबल ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रचत रामचंद्र सतरकर (२१) असे त्याचे नाव आहे. नोकरीच्या पहिल्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडली. दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने ती विजेच्या खांबाला धडकून अपघात झाला. मडगाव येथील हॉलीबॉल स्पर्धेत भाग घेऊन रचत आपल्या मावशीकडे येत होता.

तळेवाडा अडकोण बाणस्तारी येथील रचत सतरकर हा युवक मडगाव येथून केरी येथे आपल्या दुचाकीने (जीए ०५ एन ९६४३) येत होता. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी वीज खांबाला धडकली. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. काही वेळात घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाली. मात्र, डॉक्टरनी त्याला मयत घोषित केले.

रचत हा शनिवारी गोवा पोलीस दलात रुजू झाला होता. आठ दिवसांपूर्वी वाळपई येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्याचा दीक्षांत समारंभ झाला होता. शनिवारी तो रीतसर नोकरीवर रुजू झाला होता. मडगाव येथे हॉलीबॉल स्पर्धेत भाग घेऊन तो परतत होता. रचतच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ व बहीण असा परिवार आहे. रचतच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.