गवताच्या गंजीसह शेती अवजारे आगीच्या भक्ष्यस्थानी
शेतकऱ्याचे सुमारे अडीज लाख रूपयांचे नुकसान
सांगेली । प्रतिनिधी : सांगेली दळ्याचे टेंब येथे आगीत शेतमांगर भस्मसात झाला. या घटनेत संबंधित शेतकऱ्याचे सुमारे अडीज लाख रूपयांचे नुकसान झाले. आगीच्या ज्वाळा पाहून धनगरवाडीतील ग्रामस्थांनी धाव घेतली. मात्र, भर दुपारची वेळ तसेच वाऱ्यामुळे शेत मांगर जळून खाक झाला. मात्र, तरीही ही आग परीसरात पसरु नये यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्नांची पराकाष्टा करीत उर्वरीत शेती बागायती या आगीपासून वाचाविली.
सांगेली येथील महादेव शंकर पारधी यांची दळयाचे टेंब – कुंभायची शेळ येथे शेती बागायती असुन त्यात त्यांचा शेत मांगर आहे. मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ते नेहमी प्रमाणे शेती बागायतीत काम करून घरी परतले. त्यानंतर दुपारच्या सुमारास ही घटना घडली. आग लागल्याच्या घटनेनंतर सर्वप्रथम धनगरवाडीतील ग्रामस्थ घटनास्थळी धाऊन गेले. त्यानंतर गोविंद आंगचेकर, सुनिल राऊळ, सखाराम राऊळ, प्रणय सांगेलकर, ओंकार गोठोसकर आदीं ग्रामस्थांनी धाव घेतली.
प्रथम या शेत मांगराच्या लगत असलेल्या लाकडांना आग लागली. त्यानंतर या भडकलेल्या आगीमूळे शेत मांगराच्या छप्पराने पेट घेतला. यात छप्पर जळून खाक होत जमिनदोस्त झाले. तर छप्परावरील मंगलोरी कौलांचा अक्षरशः चक्काचूर झाला. शेत मांगरातील शेती औजारेही या आगीच्या भक्षस्थानी सापडली. तसेच गवताची गंजीही राख झाली. या घटनेत सुमारे अडीज लाख रूपयांचे नुकसान झाल्याने महादेव पारधी यांना धक्काच बसला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सांगेली सरपंच लवु भिंगारे, ग्रामपंचायत सदस्य सागर सांगेलकर, गुरुनाथ राऊळ, आनंद राऊळ, बाळा राऊळ आदींनी घटनास्थळी धाव घेत या नुकसानीची पाहणी केली व महादेव पारधी यांना धीर दिला. पारधी यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या वेळी सरपंच लवू भिंगारे यांनी सांगितले.
Sindhudurg