Gardeners are suffering from the problem of stray animals in Patpanhale Kondwadi area
पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे कोंडवाडी परिसरात उनाड जनावरांचा वावर वाढत चालला आहे. यामुळे येथील शेतकरी त्रस्त झाला आहे. ही जनावरे शेतकऱ्यांच्या बागायतींचे व भाजीपाला लागवडीची नासधूस करत असल्याने या जनावरांना आवरायचे कसे? ही जनावरे येतात कुठून व जनावरांचे मालक आहेत तरी कोण असा प्रश्न येथील बागायतदार शेतकऱ्यांना पडला आहे. पाटपन्हाळे कोंडवाडी येथे मोठ्या प्रमाणात आंबा, काजू, नारळ, पोपळीच्या बागा आहेत. तसेच याठिकाणी मुळा, भेंडी, पालक, मिरची, वांगी, टोमॅटो अशा विविध प्रकारची भाजी लागवडीबरोबर कलिंगड लागवडही मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील महिला याची विक्री गुहागर बाजारपेठेत व प्रत्येकाच्या घरी जावून करतात. मात्र या मोकाट जनावरांकडून या बागायतींचे व भाजीपाल्याचे नुकसान करण्यात येते. तसेच यामधील काही जनावरे अंगावर धावून येतात. या जनावरांचे मालक आपली जनावरे शोधण्याचेहि धाडस दाखवत नाहीत. परिणामी याचा नाहक त्रास येथील शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. येथील शेतकरी या मोकाट जनावरांपासून अक्षरक्षः त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या जनावरांना आवरायचे कसे? असा प्रश्न येथील बागायतदार शेतकऱ्यांना पडला आहे. येथील अनेक तरुण शेतीकडे वळलेले दिसून येतात मात्र अशा उनाड जनावरे, वानर, रानरेडे यांच्या त्रासाला कंटाळून शेती सोडावी लागत आहे.