Vengurla will once again be top in cleanliness: Principal Paritosh Kankal
‘‘वेंगुर्ला स्वच्छोत्सव २०२३‘‘ ला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
वेंगुर्ला | प्रतिनिधी : स्वच्छ सर्वेक्षणमध्ये वेंगुर्ला शहर हे देशपातळीवर झळकल्या नंतर याच पुढचं पाऊल म्हणून आपण पर्यावरण संवर्धन व संरक्षणाकरिता कांदळवन व विविध ठिकाणी स्वछता मोहीम, जनजागृती कार्यक्रम आयोजित करत आहोत. त्यामुळे वेंगुर्ला शहर पुन्हा एकदा अव्वल ठरेल अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी स्वच्छतोत्सव कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने येथील कॅम्प त्रिवेणी गार्डन मध्ये आयोजित केलेल्या एकदिवशीय ‘‘वेंगुर्ला स्वच्छोत्सव २०२३‘‘ ला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सर्वप्रथम या महोत्सवाची सुरुवात बालोत्सव अंतर्गत चित्रकला स्पर्धेने झाली. ५ ते १० वी शालेय गट, पुरुष खुला गट व महिला खुला गट या ३ गटात घेतलेल्या स्वछता विषयक चित्रकला स्पर्धेसाठी माझे शहर माझा सहभाग, प्लास्टिकमुक्त माझे शहर व स्वच्छते चा बालमहोत्सव असे विषय देण्यात आले होते. तसेच महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व साजरे करणे या उद्देशाने महिला बचत गटांचे मार्फत खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सर्व खाद्यपदार्थ खवय्यांना केळीच्या पानात दिले गेले.
यानंतर सायंकाळी हा स्वच्छोत्सवाचे उद्घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी उपनगराध्यक्षा शीतल आंगचेकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर, उमेश येरम, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे, साक्षी पेडणेकर, पूनम जाधव, श्रेया मयेकर, सुषमा प्रभूखानोलकर, पूजा कर्पे, सुनील नांदोस्कर, प्रा.आनंद बांदेकर, प्रा. पाटील मॅडम आदी उपस्थित होते. यावेळी महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व याला प्रोत्साहन देणे, झिरो वेस्ट व स्वच्छता विषयक जनजागृती करणे, लहान मुलांमध्ये स्वछतेची मूल्ये रुजवणे कारण ही पिढी पुढे जाऊन स्वछतेचा वसा टिकवून ठेवणार आहे. अशा प्रमुख उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याचे यावेळी मुख्याधिकारीकंकाळ यांनी सांगितले.यानंतर याठिकाणी स्वछता विषयक पथनाट्य, नृत्य आणि समूहगीत सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काका सावंत यांनी केले. या महोत्सवात पर्यावरणाला घातक ठरणा-या बॅनर ऐवजी कापडी तसेच फॅब्रिकचे बॅनर लावण्यात आले होते. तर याठिकाणी स्वच्छोत्सवाचे वाळू शिल्प सुद्धा रेखाटण्यात आले होते.स्वच्छोत्सव सारखा स्तुत्य उपक्रम नगरपरिषदेने घेतला आहे हे कौतुकास्पद आहे. लोकपतिनिधी नसले तरी गेल्या ५ वर्षात आम्ही जी कामे केली होती ती चांगल्याप्रकारे टिकवून ठेवण्याचे काम आज मुख्याधिकारी परितोष कंकाळ करत आहेत याबाबत समाधान वाटते असे यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी बोलताना सांगितले.