सावंतवाडी । प्रतिनिधी : सरकारला नावे ठेवण्यात व्यस्त न राहता आपणही कर्तव्य भावनेतून जनहित जोपासण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. देशाच्या उत्कर्षासाठी व विकासासाठी केवळ स्वप्न न बघता ते पुर्णत्वास नेण्यासाठी सातत्यपूर्ण व चिकाटीने प्रयत्न केला पाहिजे. देशभक्ती व देशसेवा म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसुन आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व निष्ठेने करणे होय, असे प्रतिपादन प्रा.वैभव खानोलकर यांनी केले.
लोकनेते ॲड. दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज घ्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत
व्यसनमुक्ती आणि युवक या संकल्पनेवर सात दिवसीय निवासी शिबिर नुकताच वेंगुर्ले तुळस येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समारोपीय वैचारिक मंथनासाठी महाराष्ट्राचे युवा व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध असणारे प्रा.वैभव खानोलकर यांना निमंत्रित करण्यात आले होते.
त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता ‘आजचा युवा आणि देशप्रेम ‘ आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातुन देशाबद्दल नागरिक म्हणून असणारी कर्तव्य आणि जबाबदारी या मेडिकल कॉलेजच्या युवाई समोर व्यक्त होताना भारताला जर महासत्ता बनवायचे असेल तरूणांनी पुढाकार घेतला पाहिजे. जगात जेव्हा जेव्हा क्रांती झाली, परिवर्तनाची लाट आली तेव्हा ते कार्य हे फक्त तरूणांनी केले मग ते स्वराज्याचे तोरण बांधणारे जाणते राजे शिवछत्रपती, शिकागोला भारतीय तत्त्वज्ञान ओजस्वी भाषेत मांडणारे योध्दा संन्यासी स्वामी विवेकानंद असोत की सकल विश्वाच्या उद्धारासाठी पसायदान मागणारे ज्ञानेश्वर माऊली हे सगळे तरूणच होते, असे त्यांनी सांगितले.
तर पाश्चात्य देशांत हि परिवर्तन करण्याची किमया सुध्दा युवा समाज सुधारकांनी केली.
देश हाच देव मानुन आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहून जर कार्य केले तर निश्चितपणे ती देशभक्ती ठरेल. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी तरुणाईची ताकद आणि सकारात्मक प्रयत्न करण्याची जबाबदारी या देशातील युवावरच असल्याची जाणीव त्यांनी यावेळी या विद्यार्थ्यांना करून दिली.
या समारोपीय विचार सत्रात विचारमंचावर डॉ.कर्पे, विद्यार्थी प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा.वैभव खानोलकर हे नेमळे पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयात अध्यापक म्हणून सेवा देतात तर न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा येथे हि ते कार्यरत आहेत.युवा व्याख्याते, दशावतार लोककला अभ्यासक, उपक्रमशील अध्यापक, सुप्रसिद्ध सुत्रसंचालक म्हणून ही प्रसिद्ध असून त्यांच्या ओजस्वी व देशभक्तीपर व्याख्यानामुळे युवकांमध्ये उत्साह दिसून आला.