वेंगुर्ला तालुक्यात सरासरी ६४ टक्के मतदान : मतदान प्रक्रिया शांततेत..

वेंगुर्ला : दाजी नाईक
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुक २०२४ साठी आज झालेल्या मतदान प्रक्रियेत वेंगुर्ला तालुक्यात सरासरी ६४ टक्के मतदान झाले. तालुक्यात एकूण ९३ मतदान केंद्रावर ही मतदानाची प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पडली. सकाळपासून शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली. दुपारी १ वाजेपर्यंत तालुक्यात ३६.५८ टक्के मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ८.१९ टक्के मतदान व दुस-या टप्प्यात सकाळी ११ वाजेपर्यंत २१.२९ टक्के मतदान झाले होते. तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तालुक्यात ६०.५९ टक्के तर त्यानंतर सरासरी ६४ टक्के मतदान झाले. सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. कडक उन्हामुळे दुपारी घरीच थांबणे मतदारांनी पसंत केले. दरम्यान, यावर्षी गृहभेटीद्वारे ८५ वर्षावरील वृद्ध मतदार व दिव्यांग मतदारांचे मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात आल्याने वृद्ध व दिव्यांग मतदार मतदान केंद्रावर दिसून आले नाहीत. मात्र, ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला.

भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी वेंगुर्ला शहरातील भाजपच्या बूथना भेटी देऊन आढावा घेतला. तसेच माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनीही महायुतीच्या बूथ वर भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला. वेंगुर्ला पोलिस निरीक्षक संदिप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.