चिपळूण : ‘हिरवे तळकोकण’ ही कविता लिहिणारे कोकणचे महाकवी कै. माधव केशव काटदरे यांचे चिरंजीव श्रीधर माधव काटदरे यांचे नुकतेच कंपवाताने वयाच्या ७८व्या वर्षी मुंबई येथे नुकतेच निधन झाले. श्रीधर काटदरे यांचे प्राथमिक शाळेतील शिक्षण चिपळूण शहरातील चिंचनाक्यावरील मराठी शाळेत तर माध्यमिक शिक्षण युनाइटेड इंग्लिश स्कूल येथे झाले होते. महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाल्यानंतर त्यांनी मुंबई येथे बांधकाम व्यवसाय सुरु केला होता. चिपळूण शहराशी त्यांचा नित्यसबंध होता. १९९२साली कवी माधव यांच्या जन्मशताब्दीनिमित्त झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संमेलनात त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला होता. कवी माधव यांची अनेक हस्तलिखिते त्यांनी जतन करून ठेवली होती. कवी माधव यांच्या साहित्यावर डॉ. सौ. रेखा देशपांडे यांनी पीएच.डी. करण्याची इच्छा व्यक्त करताच सारी हस्तलिखिते श्रीधर काटदरे यांनी डॉ. सौ. देशपांडे यांच्या स्वाधीन केली होती.त्यांनी दिलेल्या देणगीतून शहरातील श्रीकृष्ण व्याख्यानमालेत प्रतिवर्षी कवी माधव यांच्या स्मृत्यर्थ व्याख्यान आयोजित केले जाते. श्रीधर काटदरे यांच्या मागे त्यांच्या पत्नी, स्नुषा, सुपुत्र असा परिवार आहे.