जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महारांजांचे प्रतिपादन
नाणीज : प्रभू रामचंद्रांनी धर्माचे पालन केले व दुष्टांचा संहार केला. त्यांनी नितीमूल्यांची शिकवण दिली, असे प्रतिपादन जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी येथे केले. ते सुंदरगडावर झालेल्या श्रीराम नवमी वारी उत्सवाच्या समारोपप्रसंगी झालेल्या त्यांच्या प्रवचनात बोलत होते.जगद्गुरूश्री पुढे म्हणाले,“ धर्म ही एक विचारधारा आहे. जीवनमात्राशी कसे वागावे, कसे जगावे हे शिकवते त्याला धर्म म्हणतात. धर्म म्हणजे जबाबदारी आहे. प्रभू रामांनी धर्माचे पालन केले व दुष्टांचा संहार केला. त्यांनी नितीमूल्यांची शिकवण दिली. त्याचे राज्य खऱ्या अर्थाने रामराज्य होते. आजही लोक म्हणतात राम राज्य आले पाहिजे. एवढी त्याची थोरवी आहे.”
ते म्हणाले,“रामराज्यात सर्व मार्यादांचे पालन केले जायचे. आज आपली संस्कृतीच नष्ट झाली आहे. म्हणून धर्म संकटात आहे. तो वाचवायला पाहिजे. सहिष्णुता, विश्वबंधुत्व, हे विश्वची माझे घर अशी आमच्या धर्माची विचारधारा आहे. प्रभू रामाचे व साधुसंतांचे भारतवर्षावर संस्कार आहेत. त्यांनी धर्माचे पालन करताना कोणाला उपद्रव दिला नाही.”
ते पुढे म्हणाले,“ प्रभू श्रीराम सर्वांचा उद्धार करण्यासाठी अवतीर्ण झाले. शक्ती, सौंदर्य, सद्गुण, औदार्य, वैराग्य, ऐश्वर्य असे सारे सद्गुण प्रभू श्रीरामांच्या अंगी होते. राजा दशरथाचा मुलगा भगवंत कसा होऊ शकतो? त्यासाठी त्यांचे पैलू समजून घेतले पाहिजेत. तसे जगले पाहिजे. अध्यात्म हा ऐकण्याचा विषय नाही तो जगण्याचा विषय आहे. श्रीरामांनी आदर्शाचे, नीतिमूल्यांचे पालन केले. ते आदर्श पुत्र, आदर्श बंधू , आदर्श पती, आदर्श मित्र, आदर्श राजा, आदर्श शत्रू, अजात शत्रू, धर्म पालक व देवत्व प्राप्त झालेले असे होते. सारे सद्गुण त्यांच्या ठायी होते. त्यांच्या आदर्शाचे व नीतिमूल्यांचे पालन आपण केले पाहिजे.”यापूर्वी प.पू. कानिफनाथ महाराजांचे अमृतमय प्रवचन झाले. अन्य राज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी त्यांनी हिंदीतून प्रभावी प्रवचन केले. जगद्गुरू श्रींचे प्रवचन संपल्यावर देवाला साकडे घालण्यात आले. त्यानंतर या वारी उत्सवाची सांगता झाली.