राष्ट्रीय महामार्गाचे काम मान्सुन आधी पुर्ण करण्याचे प्राधिकरणासमोर आव्हान

नागरीकांचे हाल, अपघातांची मालिका, संपर्क तुटणार, समस्याकडे दुर्लक्ष

मंडणगड | प्रतिनिधी : यंदाचे बांधकामाचे हंगामात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तालुक्यातील म्हाप्रळ ते पाचरळ या अंतरात काँक्रिटीकृत रस्त्याचे कामास सुरुवात झाली. हंगामात रस्त्याचे नव्वद टक्के काम पुर्ण करणे आपेक्षीत असताना मान्सुन आधी हा मार्ग वाहतूकीसाठी योग्य करण्याची शक्यता पुर्णपणे मावळली आहे. म्हाप्रळ ते मंडणगड व मंडणगड ते पाचरळ या अंतरात ठिकठीकाणी खोदण्यात आलेल्या रस्त्याचे काम तरी पुर्ण करा अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.

 

तालुक्याचे मुख्य रहदारीचा रस्ता यंदा मोठ्या प्रमाणावर खोदण्यात आला व मान्सुन पुर्व पावसाने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हजेरी लावल्यावर पावसाळ्यात काय होणार याची साक्ष तालुकावासीयांना मिळाली आहे. बांधकामासाठी फिरणाऱ्या अवजड वाहनांमुळे शहर परिसरातील रस्ता ही पुर्णपणे नादुरुस्थ झाल आहे व महामार्ग प्राधिकरणाचे सद्यस्थितीतील नियोजन लक्षात घेता हा रस्ता पुढील हंगामात पुर्ण होण्याचीच शक्यता अधिक वाटत आहे. रस्त्याची रोड कनेक्टीव्हीटी रहावी या करिता खोदून ठेवलेल्या रस्त्यातील किमान एक लेन पुर्ण व्हावी अशी मागणी असली तरी ती पुर्ण होण्याची शक्यता फारच कमी आहे. यंदाच्या हंगामात प्राधिकरणाने या रस्त्याचे कामास मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली. म्हाप्रळ ते आंबडवे या चाळीस किलोमीटर अंतरात रुंदीकरण व वाकणे, चढ उतार कमी करण्याकरिता वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे. यामुळे प्रंचड प्रमाणात धुळ निर्माण झाली होती. त्यावर पाणी मारुन देखील धुळ कमी झालेली नसल्याने नागरीकांची मोठी अडचण झाली. या कालावधीत मोठ्या संख्येने दुचाकी अपघात झाले असून यातील बहुतांश दुचाकीस्वार जखमी झाली आहेत. यास जबाबदार कोण, जर नागरीक रस्त्याच्या कर पुर्ण भरत असतील व नादुरुस्त रस्त्यांमुळे अपघात झाल्याने वाहने व मनुष्यबळाचे नुकसान झाल्यास त्यांचे नुकसान कोणी द्यायचे असा प्रश्न उपस्थित झाला असून जागरुक नागरीक या विरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. यंत्रणेने निर्माण केलेल्या अवस्थेमुळे तालुकावासीयांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

नादुरुस्थ रस्त्यामुळे तालुक्यातील वाहनांचे सरकारी आर्युमान दोन ते तीन वर्षाचेंच आहे. वाहने नादुरुस्थ होण्याकरिता सर्वात मोठी भुमिका पाच वर्षापासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाची आहे. दोन व तीन चाकी नागरीकांसाठी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. तालुक्यातील नागरीक लहान गाड्या घेऊन या रस्त्यावर फिरण्याचे धारिष्ठ्य दाखवत नाहीत व नाईलाजाने फिरणारे अपघातांचे शिकार बनतात. पावसाचे आपत्तीचे दिवसात ही परिस्थिती आणखीनच बिकट होणार आहे. किमान एक लेन तरी पुर्ण करा अशी मागणी येथील जनता टाहो फोडून करीत आहे पण ऐकणार कोण. प्राधिकरणाचे कार्यालय महाडात, ठेकेदार नागपुरात, कैफियत मांडयाची तर तहसिलशिवाय पर्याय नाही व तहसिलदारांचे वेळोवेळीच्या आदेशाला या दोघांनी प्र्त्येक वेळी केराची टोपली दाखवली आहे.