भाजपा नेते युवराज लखम सावंत भोसले यांच्या हस्ते उद्घाटन
सावंतवाडी । प्रतिनिधी :अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन सोमवारी भाजपा नेते युवराज लखम सावंतभोसले यांच्या हस्ते झाले. सावंतवाडीतील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सभागृहात आयोजित या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवकालीन युद्ध साहित्याचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून या प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ झाला.
उद्घाटन प्रसंगी युवराज लखमराजे भोसले यांनी युद्ध साहित्याच्या वापरा संबंधी माहिती जाणून घेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वप्रथम संपन्न होत असलेल्या या शिबिराची गरज व महत्त्व आपल्या शुभेच्छापर मनोगतातून व्यक्त केले. तसेच कोल्हापूर मधील प्रमुख वस्ताद प्रमोद पाटील यांनी या युद्धकला प्रशिक्षण शिबिराची पार्श्वभूमी सांगून आपल्या कार्याचा आणि अनुभवाचा थोडक्यात परिचय दिला.
यावेळी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.प्रसाद नार्वेकर, अभिनव फाऊंडेशनचे किशोर चिटणीस, राजू केळुसकर, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव गौरांग चिटणीस, संचालक सौ.राजश्री टिपणीस, अभिनव फाऊंडेशनचे तुषार विचारे, खजिनदार जितेंद्र मोरजकर, अण्णा म्हापसेकर, अभिषेक देसाई, विठ्ठल वालावलकर, मंदार केरकर, प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. सदर प्रशिक्षण शिबिर पुढील सहा दिवस सुरू असणार आहे.
Sindhudurg