सम्यक साहित्य संसदेचा पुरस्कार वितरण व प्रकाशन सोहळा दिमाखात
सावंतवाडी । प्रतिनिधी :
माणसाचा जन्मच ‘फेमिनिझम’च्या प्रारंभाने होत असतो. पुरुषी अहंकाराला नाकारत, आधुनिक काळात स्त्रीयांनी आपल्या आंतरिक क्षमता जागतिक पातळीवर सिद्ध केल्या आहेत, असे असताना भारतात मात्र ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ चा नारा देणारी व्यवस्था, बिल्किस बानोसारख्या असहाय्य स्त्रीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना केवळ ते उच्च जातीचे व तुरूंगातील त्यांचे वर्तन सुसंस्कृत असल्याचे निष्कर्ष काढून त्यांना दोषमुक्त करते याची राज्यकर्त्यांनी लाज बाळगली पाहिजे. स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचा उद्घोष करणार्या संविधानाच्या साक्षीने अधम कृतीला अनुल्लेखाने पाठिंबा देणार्या राजकीय व्यवस्थेला सामान्य जनतेने जाब विचारला पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार अर्थतज्ज्ञ डाॅ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.
सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग संस्थेच्या वतीने आयोजित मुंबई येथील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या डॉ. सुरेंद्र गावस्कर सभागृहात पुरस्कार वितरण व प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. आयदानकार, जेष्ठ लेखिका उर्मिला पवार यांना ‘आबा शेवरे जीवनगौरव काव्य पुरस्काराने तर डाॅ. श्रीधर पवार यांना ‘उत्तम सर्वोत्तम’ राज्यस्तरीय काव्य पुरस्काराने डाॅ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र व गौरवचिन्ह व रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व संविधान मशाल प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विचारमंचावर, आंबेडकरीवादी समीक्षक मोतीराम कटारे, लोकसाहित्याच्या अभ्यासक डाॅ. श्यामल गरूड, सामाजिक कार्यकर्त्या विजया चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष सुनील हेतकर उपस्थित होते.
या प्रसंगी सुनील हेतकर यांच्या ‘इस्तव’ या कथासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ आंबेडकरी समीक्षक मोतीराम कटारे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत केले. तर उर्मिला पवार यांच्यावरील धनंजय शांता-बळीराम धेंडे यानी प्रकाशित केलेल्या व उषा अंंभोरे यांनी संपादित केलेल्या ‘चौकटीत न मानणारे व्यक्तिमत्व-उर्मिला पवार’ त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त काढलेल्या गौरवग्रंथाचे प्रकाशन डॉ मुणगेकर यांचे हस्ते करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त डॉ. श्रीधर पवार यांनी आपल्या वैद्यकीय कार्यकिर्दीतील अनुभवास आलेल्या स्त्रियांच्या जीवनातील दाहक दुःखाची अल्प शब्दांत मांडणी करतानाच आपली कविता कशी जन्मास आली व चळवळ हेच आपल्या जीवनाचे मूलतत्त्व राहिल्याचे नमूद केले तर उर्मिला पवार यांनी आपण केवळ लेखिका म्हणून कार्य केले नसून शोषित स्त्रियांवर वेळोवेळी होणारे कौटुंबिक, सामाजिक व सांस्कृतिक पातळीवरील अन्यायाच्या वेळी अनेक महिलांना सोबत घेत संघटन शक्तीच्या माध्यमातून शासन दरबाराला जाब विचारण्याचे काम केले व त्यातूनच आम्ही इतिहास घडवल्यासारखी पुस्तके आणि तथागतांच्या प्रज्ञा, करुणा यावर निष्ठा दाखवणारी लेखनसंपदा निर्माण झाली.
लेखक हा प्रथम कार्यकर्ता असला पाहिजे याचे आत्मभान यावेळी उर्मिला पवार यांनी बोलून दाखवले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या विजया चव्हाण यांनी उर्मिला पवार यांच्या जीवनातील कार्याचा आढावा घेतला तर लोकसाहित्याच्या अभ्यासक डाॅ. श्यामल गरूड यांनी सुनील हेतकर यांच्या ‘इस्तव’ या कथासंग्रहावर भाष्य केले.
श्रीधर पवार यांच्या सन्मानपत्राचे वाचन स्नेहल सिद्धार्थ तांबे यांनी केले तर उर्मिला पवार यांच्या मानपत्राचे वाचन स्नेहा विठ्ठल कदम यांनी केले. या कार्यक्रमाला मुंबई आणि परिसरामधून तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात साहित्यिक, कार्यकर्ते व रसिक मान्यवर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर प्रतिक उत्तम पवार यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे सचिव सिद्धार्थ गोपाळ तांबे यांनी डॉ. केले. स्वागत व परिचय ‘प्रसंवाद’ चे संपादक अनिल जाधव यांनी केले. शेवटी सर्व उपस्थित व मान्यवर यांचे आभार संस्थेचे सहसचिव अरुण नाईक यांनी मानले व या शानदार समारंभाची सांगता करण्यात आली.
फोटो – जेष्ठ लेखिका उर्मिला पवार यांना ‘आबा शेवरे जीवनगौरव काव्य पुरस्काराने तर डाॅ. श्रीधर पवार यांना ‘उत्तम सर्वोत्तम’ राज्यस्तरीय काव्य पुरस्काराने गौरविताना डाॅ. भालचंद्र मुणगेकर सोबत सम्यक संस्थेचे पदाधिकारी
Sindhudurg