खेड(प्रतिनिधी)
गेल्या दोन आठवड्यात शहरात झालेल्या अवकाळी पावसाच्या प्रवाहात वाहून आलेल्या प्लास्टिक कचऱ्याबरोबरच चिखलमिश्रित गाळामुळे शहरातील काही गटारे-नाले सांडपाण्याने तुंबली आहेत. सांडपाणी रस्त्यावरून वाहून परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने रहिवाशांसह वाहनचालक व पादचाऱ्यांना नाक मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. या धर्तीवर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील सफाई कर्मचाऱ्यांमार्फत तुंबलेली गटारे-नाले मोकळी करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.
तालुक्यासह शहरात मागील २ आठवड्यात पडलेल्या धुवाँधार पर्जन्यवृष्टीसह सोसाट्याच्या वादळी वाऱ्यानेही साऱ्यांचीच दाणादाण उडवून महावितरण खात्यासह शहरासह ग्रामीण भागातील घरे, दुकाने व इमारतींवरील पत्र्यांच्या शेडचे तसेच महाकाय वृक्षांचे अतोनात नुकसान करत ‘कोट्यावधींची वित्तहानी केली. अजूनही अनेक ठिकाणी नुकसानीचे दृश्य दृष्टीस पडत आहेत.
मुसळधार पावसामुळे शहरातील ठिकठिकाणचे गटारे-नाले दुथडे भरून वाहण्यासह शिवतररोड, एसटीस्थानक, स्व.मीनाताई ठाकरे नाट्यगृहासमोरील मुख्य रस्त्यावरून पावसाचे पाणी वहात होते. यामुळे पाण्यासोबत वाहून आलेल्या प्लास्टिक कचऱ्याबरोबरच माती व वाळूमिश्रित गाळ ठिकठिकाणच्या गटारे- नाल्यांमध्ये अडकून पडल्याने तुंबली आहेत. सद्यस्थितीत पाऊस नसला तरी गटारे-नाल्यांमधून वाहणारे दुर्गंधीयुक्त सांडपाणी तुंबलेल्या स्थितीत असून सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने रहिवाशांसह वाहनचालक व पादचाऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.
शहरातील खांबतळे, शिवतररोड, डाकबंगला-खोंडे रस्ता आदी ठिकाणची गटारे-नाले तुंबून सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. रस्त्यावरील दुर्गंधीयुक्त सांडपाणी भरधाव वेगातील वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या अंगावरही उडत आहे













