मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड तालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी व तांत्रीक कर्मचाऱ्यांच्या रिक्त असलेल्या पदांमुळे तालुक्यातील सार्वजनीक वैद्यकीय सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. वैद्यकीय सोयी व सेवा मिळवण्याकरिता खाजगी रुग्णालयात जावे लागत असल्याने त्याचा अतिरिक्त भुर्दंड तालुक्यातील गोरगरीब जनतेला बसत आहे. ग्रामीण रुग्णालयासह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती सोयीसुविधांनी परिपूर्ण असताना केवळ डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांची उपलब्धता नसल्याने तालुक्यातील रुग्णांची होणारी गैर सोईचे प्रश्नाकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार श्री संजय भिसे यांची 6 एप्रिल 2023 रोजी तहसील कार्यालयात भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.
निवेदनातील माहितीनुसार उपरोक्त विषयांवर मंडणगड तालुक्यातील गोरगरीब जनता आपल्या आजारपणात वैद्यकीय सेवांचा लाभ घेण्याकरिता शासनाने उभारलेल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करता येते. परंतु येथे आल्यानंतर त्यांची प्रचंड हेळसांड होत असते तसेच उपचारांची प्रचंड गैरसोय होत आहे. याचे कारण शोधले असता ग्रामीण रुग्णालयात एकूण 26 पदे मंजूर असताना केवळ 14 पदे भरलेली आहेत. सर्वात विशेष म्हणजे ग्रामीण रुग्णालयात सर्वात महत्त्वाची भूमिका असणारे वैदिक अधीक्षक पदासह वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत या कारणांमुळे रुग्णांना आवश्यक ती सेवा मिळत नसल्याने तालुक्यातील जनतेच्या आरोग्य धोक्यात आले आहे. तरी आपण या गंभीर समस्येबाबत योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका मंडणगड या पक्षाच्या वतीने मंडणगड तालुक्यातील जनतेच्या आरोग्यविषयक हितासाठी आक्रमकपणे जन आंदोलन करण्यात येईल अशा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष नागसेन तांबे, तालुका सरचिटणीस रामदास खैरे, महिला तालुकाध्यक्ष प्रज्ञा दाभोळकर, जिल्हा संघटक विजय खैरे जिल्हा सदस्य किरण पवार, संदेश खैरे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील तांबे, सुरेश तांबे, संकेत तांबे, संदीप येल्वे, स्वप्निल धोत्रे, विधान पवार, वीरेंद्र जाधव, मुरा तांडेल, आकाश पवार, अंकुश कासारे सत्यम जाधव, संतोष कासारे, भाई कासारे आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहे.