पुणे : देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार केरळमध्ये नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) आगमन झाल्याचे हवामान विभागाने आज जाहीर केले. केरळचा बहुतांशी भाग, तमिळनाडूच्या दक्षिण भागात मॉन्सूनने प्रगती केली आहे, तर ईशान्य भारतात जोरदार मुसंडी मारत पूर्वोत्तर राज्यांच्या बहुतांश भागांत मॉन्सून पोहोचला आहे.
यंदा केरळमध्ये दोन दिवस, तर पूर्वोत्तर राज्यात सहा दिवस अगोदर मॉन्सून दाखल झाला आहे.
दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मॉन्सून साधारणत: १ जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचतो. यंदा मॉन्सून ३१ मेपर्यंत केरळमध्ये येण्याचा अंदाज होता. दीर्घकालीन सरासरीच्या दोन दिवस आधीच मॉन्सूनने देवभूमी केरळमध्ये धडक दिली आहे. गतवर्षी मॉन्सूनचे आगमन लांबल्याने ८ जून रोजी मॉन्सून दाखल झाला होता. यातच ‘रेमल’ चक्रीवादळामुळे चाल मिळाल्याने पूर्वोत्तर राज्यांमध्ये ५ जूनपर्यंत डेरेदाखल होणारा मॉन्सून यंदा ६ दिवस आधीच पोहोचला आहे.
आग्नेय अरबी समुद्र आणि केरळमधील ढगांचे आच्छादन, दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस, समुद्र आणि भूभागावरून परावर्तित होणारा किरणोत्सर्ग, समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत पश्चिमेकडून वाहणारे वारे, हवेच्या खालच्या थरात २५ ते ३० नॉट्सपर्यंत पोहोचलेला वाऱ्याचा वेग आणि केरळमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पडणारा पाऊस यावरून मॉन्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
गुरुवारी (ता. ३०) दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेट समूह, केरळचा बहुतांश भाग, तमिळनाडूचा दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाला आहे. अमिनी, कन्नूर, कोइमतूर, कन्याकुमारीपर्यंतच्या भागात मॉन्सून दाखल झाला आहे. तर नागालँड, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय आणि आसामसह ईशान्य भारताच्या बहुतांश राज्यात मॉन्सूनने प्रगती केली आहे. दोन दिवसांत संपूर्ण केरळ व्यापून दक्षिण कर्नाटकसह तमिळनाडूच्या आणखी काही भागांत मॉन्सून प्रगती करण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातूनही मॉन्सूनची प्रगती सुरू राहण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे.
नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामाच्या मध्यावर ‘ला-निना’ स्थिती तयार होण्याचे, तसेच इंडियन ओशन डायपोल (आयओडी) धन (पॉझिटिव्ह) राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.