A military base of Dalwatan will be realized in Lotisma’s museum
तंजावरचे महाराज श्रीमंत शिवाजी भोसले यांच्या हस्ते शुभारंभ
संतोष कुळे | चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तालुक्यातील दळवटणे येथील सैन्यतळाची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ तंजावरचे राजे श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांच्या हस्ते दिनांक ११ एप्रिल रोजी होणार आहे. यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते वंशातील प्रतिभा सुरेश धुमाळ यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
येत्या ६ जूनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या राज्याभिषेकापूर्वी महाराज चिपळूण तालुक्यातील दळवटणे येथे एक महिना मुक्कामी होते. इथेच महाराजांचे सैन्यतळ होते. महाराजांचे व चिपळूणचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होण्याचा औचित्य धरुनच लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर पुढील वर्षभरात विविध उपक्रम आयोजित करणार आहे. यातील महत्वाचे कार्य म्हणजे दळवटनेतील सैन्यतळाची प्रतिकृती लोटीस्माच्या संग्राहलयात साकारण्यात येणार आहे व याप्रसंगी महाराजांच्या तैलचित्राचेही अनावरण होणार आहे. या कार्याचा शुभारंभ तंजावरचे राजे श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांच्या हस्ते मंगळवार दिनांक ११ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.
दळवटणे येथील सैन्यतळाच्या ठीकाणी महाराजांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना सरसेनापतीची वस्त्रे बहाल केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने याच घराण्यात जन्मलेल्या प्रतिभा सुरेश मोहिते (धुमाळ) यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमात आमदार शेखर निकम यांच्या हस्ते राजे श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृषीभूषण तानाजीराव चोरगे हे भूषविणार आहेत. तसेच उद्योजक प्रशांत यादव प्रमुख पाहुणे उपस्थित रहाणार आहेत. यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांचा सत्कार होणार आहे. तरी या कार्यक्रमाला शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन लोटीस्माचे अध्यक्ष डॉ.यतीन जाधव,कार्याध्यक्ष धनंजय चितळे व कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे.