खेर्डी येथील सुजाता पवार यांची मसाले उत्पादन- विक्रीतून स्वावलंबनाकडे झेप

Sujata Pawar from Kherdi made a leap from spice production and sales to self-reliance

चिपळूण | संतोष सावर्डेकर :  तालुक्यातील खेर्डी येथील सुकाई महिला बचत गटातील सुजाता श्रीकांत पवार यांनी या गटाला मिळालेल्या २ लाख ५० हजार रुपयांपैकी ५० हजार रुपये कर्ज घेऊन या रक्कमेतून मसाले उत्पादन व विक्री व्यवसाय सुरू केला. आता या व्यवसायातून सुजाता पवार यांनी स्वावलंबनाकडे झेप घेतली आहे. या व्यवसायात त्या कमालीच्या यशस्वी झाल्या आहेत. याबद्दल महिला वर्गामधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महिला स्वावलंबनाच्या युगात महिलांनी आत्मनिर्भर व्हावे म्हणून विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. शासनाची विविध खाती,विविध बँका,पतसंस्था,सामाजिक संस्था- संघटना महिला स्वावलंबनासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत.याचा अनेक महिलांना,महिला गटांना प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष फायदाच होताना दिसत आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील किंबहुना शहरी भागातील महिला शासनाच्या विविध योजना / उपक्रम आता ठिकठिकाणी राबविण्यासाठी पुढे येताना दिसत आहेत .विकास सहयोग प्रतिष्ठानतर्फे चिपळूण आणि गुहागर तालुक्यामध्ये विदर्भ कोंकण ग्रामीण बँक आणि नाबार्ड (रत्नागिरी) च्या सहकार्याने महिला आत्मनिर्भरतेसाठी जे.एल.जी.प्रकल्पाच्या माध्यमातून काम सुरु आहे.पाच जणींच्या महिला गटांना विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला जातो.चिपळूण आणि गुहागरमधील सुमारे १८३ महिला जे.एल.जी.गटांना विकास सहयोग प्रतिष्ठानच्या पुढाकाराने प्रत्येक गटाला २,५०,००० याप्रमाणे विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेने महिलांच्या स्वतःच्या व्यवसायांसाठी कर्ज पुरवठा केलेला आहे.बँकेच्या या योजनेचा अनेक गटांना फायदा झाला असून चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील सुकाई गटाला ३ वर्षांपूर्वी विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेच्या चिपळूण शाखेतर्फे २,५०,००० रु. कर्ज पुरवठा करण्यात आला होता.या गटांतील महिलांनी हॉटेल आणि मसाले विक्रीसाठी हे कर्ज घेतले होते. याच गटांतील सुजाता श्रीकांत पवार या महिलेने मसाले विक्रीच्या व्यवसायासाठी ५०,००० रु.एवढे कर्ज विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेकडून घेतले होते. विविध प्रकारचे मसाले तयार करणे आणि ते ग्राहकांना विकणे या तत्वावर त्यांनी व्यवसाय सुरु केला.दुकानासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने सुजाता पवार यांनी आपल्या खेर्डी येथील राहत्या घरातून हा व्यवसाय सुरु केला. सध्या मसाल्याचे हे विविध प्रकार आपल्या घरातून विकत देतात.

सेंद्रिय गुळ,मिरची पावडर,मालवणी मसाला,घाटी मसाला आणि बेडगी,संकेश्वरी तसेच गुंटूर जातीच्या मिरचीची विक्री ते आपल्या घरातून करीत आहेत.विटा,सांगली आणि कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून कच्चा माल सुजाता पवार आणतात .कच्चा माल आणण्यासाठी त्यांचे पती श्री.श्रीकांत पवार हे मदत करतात,शिवाय packing,मार्केटींग.आणि सर्व प्रकारच्या मदतीसाठी त्यांच्या पतीचा मोठा हातभार लागतो असे त्या अभिमानाने सांगतात.त्याचबरोबर त्यांच्याच गटांतील सदस्या आणि विकास सहयोग प्रतिष्ठानच्या विकास दूत पूजा कासार यांच्या प्रोत्साहनामुळे खूप मोठी मदत होते अशी भावना देखील त्या व्यक्त करीत आहेत. आपल्या व्यवसायाचा नीट प्रचार -प्रसार व्हावा म्हणून विविध समाज माध्यमांचा देखील त्यांना उपयोग होत आहे,शिवाय Mouth publicity,home to home डिलिवरी या माध्यमांचा देखील त्या खुबीने वापर करीत आहेत. चिपळूण तालुक्यातील कामथे येथील ब्रिटानिया कंपनीची नोकरी सोडून सुजाता पवार यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा मार्ग पत्करला आणि त्यामध्ये त्या कमालीच्या यशस्वी झाल्या आहेत असे त्या आत्मविश्वासाने सांगत आहेत.दरमहा किमान १२,००० रु पेक्षा जास्त नफा यातून त्या मिळवीत आहेत.घरच्या ईतर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून मासले तयार करणे आणि ते विकणे या व्यवसायाला त्यांना आता मोठे रूप द्यायचे आहे यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यासाठी त्या विविध स्तरावर प्रयत्न करीत आहेत.विकास सहयोग प्रतिष्ठानच्या सर्वतोपरी मार्गदर्शन,सहकार्यमुळे,प्रोत्साहन आणि पाठींब्यामुळे हे शक्य झाले आहे अशी कृतज्ञतापूर्वक भावना व्यक्त करण्यास सुजाता पवार विसरलेल्या नाहीत .