रत्नागिरी | प्रतिनिधी : आयपीएल सामने पाहताना ग्रामीण भागातील क्रिकेटप्रेमींनाही मैदानावर गेल्याचा ‘आनंद’ लुटता येणार आहे. आयपीएल2023चे चार सामने मोठ्या भव्य स्क्रिनवर फॅन पार्कच्या माध्यमातून रत्नागिरीकरांना 8 व 9 मार्च रोजी पाहता येणार आहेत.बीसीसीआयचे प्रतिनिधी आनंद दातार यांनी आज रत्नागिरीत येऊन फॅनपार्कची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किरण सामंत, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे बिपीन बंदरकर, दीपक साळवी, बाळू साळवी, निलेश भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
देशातील 45 शहरांमध्ये टाटा आयपीएलचे चित्तथरारक क्षण फॅन पार्कच्या माध्यमातून क्रिकेट रसिकांना पाहता येणार आहेत. यात महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश असून यात सोलापूर, रत्नागिरी व कोल्हापूरचा समावेश आहे. सोलापूरमध्ये फॅनपार्कच्या माध्यमातून सामन्यांचा तेथील क्रिकेटप्रेमींनी आनंद उपभोगला. आता रत्नागिरीमध्येही क्रिकेटप्रेमींनी फॅनपार्कच्या माध्यमातून जल्लोष अनुभवता येणार आहे. बीसीसीआयच्या माध्यमातून हे सामन्यांचे प्रक्षेपण मोफत पाहता येणार आहे. संगीत, खाद्यपदार्थांचे स्टॉल, अधिकृत प्रायोजकांद्वारे शीतपेये व अनेक मजेदार गोष्टींची व्यवस्था करण्यात आली आहे. फॅनपार्कमध्ये क्रिकेट प्रेमींना शनिवारी राजस्थान रॉयल विरुध्द दिल्ली कॅपिटल, मुंबई इंडियन्स विरुध्द चेन्नई सुपर किंग्ज, रविवारी गुजरात टायटन्स विरुध्द कोलकाता नाईट रायडरस आणि सनराईज हैद्राबाद विरुध्द पंजाब किंग्ज हे सामने पाहता येणार आहेत. यासाठी दहा हजारहून अधिक क्रिकेटप्रेमी एका वेळी सामने पाहू शकतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आल्याचे बिपीन बंदरकर यांनी सांगितले.