‘सिंधू रत्न’ मधून करणार रत्नागिरीतील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण

पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती; महिलाकडे दुध संकलन, मासे विक्रेत्यांना दुचाकी

रत्नागिरी | प्रतिनिधी :

रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांचा सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या सिंधू रत्न समृद्ध योजनेतून बचत गटातील महिलांसाठी दुग्ध संकलन योजना आणि मासे विक्री करणाऱ्या महिलांसाठी अनुदानित दुचाकी उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधू रत्न समृद्ध योजनेचा रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा घेतला. या योजनेतून वैयक्तिक लाभासाठी, आंबा व्यवसाय, मत्स्य व्यवसाय आणि पर्यटन व्यवसाय यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. आजच्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांनी सिंधू रत्न मधून अनेक नव्या योजनांची घोषणा केली. त्यातही महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामध्ये बचत गटातील महिलांसाठी दूध संकलन योजना सुरु करण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्हा बँकेशी बोलून या महिलांच्या गटाला गाई आणि म्हशी उपलब्ध करून देईनात येणार आहेत. या बचत गटांची एक संस्था सुरु करून त्याच्या माध्यमातून या बचतगटांकडील दुधाचे संकलन करून ते वारणा, गोकुळ, रत्नागिरीतील वाशिष्ठी सारख्या दूध कंपन्यांना उपलब्ध केले जाणार आहे. त्याचा पायलट प्रकल्प रत्नागिरी तालुक्यात सुरु करणार असल्याचे पालक मंत्र्यांनी सांगितले.

तसेच ज्या महिला मत्स्य विक्री व्यवसाय करतात त्यांना ३५ टक्के अनुदान देऊन दुचाकी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यावर सिंधू रत्न योजना, लाभार्थी यांचे नाव नोंदवण्यात येणार आहे. गाडीच्या मागे मासळी ठेवण्यासाठी बॉक्स बसण्यात येणार आहे. पहिल्या १०० महिलांना हि गाडी घेण्यासाठी संधी दिली जाणार आहे असेही यांनी सांगितले.

त्याशिवाय सिंधुरत्न समृद्ध योजनेतून आंबा बागायतदारांसाठी ४ कूलिंग व्हॅन घेतल्या जाणार आहेत. जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून भात, नाचणी तसेच मसाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध केले जाणार आहे. महाराष्ट्रातील पहिला खेकडा बीजोत्पादन प्रकल्प रत्नागिरीत शिरगाव येथे उभारला जाणार असून त्यासाठी ४ कोटी ७४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मच्छिमारांसाठी अनुदानित छोटा हत्ती हे वाहन दिले जाणार असून त्यामध्ये दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना ५० % आणि त्या वरील लाभार्थ्यांना ३५ % अनुदान दिले जाणार आहे. मालगुंड येथे होणाऱ्या प्राणी संग्रहालयासाठी जागा घेण्याची तोंडी मंजुरी केंद्राने दिली असून जागेसाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर वसमत येथे हळद संशोधन केंद्र होत आहे त्याचे उपकेंद्र रत्नागिरीत व्हावे यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याना विनंती करणार असल्याचे पालकमंत्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.