पर्यावरण संवर्धनासाठी रानमित्र आचरा तर्फे जनजागृती

आचरा | अर्जुन बापर्डेकर : अलीकडील काळात आपण नैसर्गिक आपत्तींना तोंड देत आलो आहोत. त्यातच निसर्गाची हानी करणारे कारनामे मानवाकडून जाणीवपूर्वक होत आहेत. पर्यावरणाचा समतोल राखणे आपल्या हातात आहे. मात्र ज्या खबरदारी घ्यायला पाहिजेत, त्या होत नसल्याने ‘लाखमोलाचे काम करूया, पर्यावरणाचा समतोल राखुया’ ही ब्रीदवाक्य घेऊन आचरेतील ‘रानमित्र आचरा’ या संस्थेने पर्यावरण संवर्धनासाठी २०१९ पासून पुढाकार घेतला आहे.

अलिकडच्या काळात परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटना घडत आहेत. वाढलेली उष्णता, सोसाट्याचा वारा, मानवाचा वाढलेला बेजबाबदारपणा ही वणव्याची मुख्य कारणे आहेत. आगीमध्ये काजू, आंबा कलम बागा, पाळीव प्राणी तसेच जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. बहुमुल्य औषधी झाडे, दुर्मिळ पक्ष्यांची अंडी व सरपटणारे प्राणी जळून जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध अशा जैवविविधतेसाठी सर्वत्र ओळखला जातो. परंतु जंगलाला निरुपयोगी समजून जाणीवपुर्वक आग लावली जाते किंबहुना चुकून लागल्यास विझवण्याचा प्रयत्नही केला जात नाही, ही शोकांतिका आहे, असे रानमित्रचे शिलेदार सांगतात.

ग्रामसभा व सोशल मीडिया तसेच अन्य समाजमाध्यमातून गावातील लोकांमध्ये वणव्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. बेजबाबदारपणे आग लावून शेतकऱ्यांचे व जैवविविधतेचे नुकसान करणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणीही रानमित्रकडून करण्यात आली आहे. या संस्थेकडून आचरा परिसरात भीतीपत्रक तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संवर्धन करण्याबाबात आवाहन करण्यात आले आहे. तसेच पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमेत अनेकांना सामावून घेतले जात आहे.

वणवा लागला तर कोणती खबरदारी घ्याल?
● जंगल ही आपली संपत्ती असून तिला वाचविण्याचा प्रयत्न करा.
● गरज असल्यास योग्य ती खबरदारी घेऊन पाणी आणि मनुष्यबळाच्या साहाय्याने संध्याकाळी ६ नंतरच आग लावावी.
● गरजेपुरती आग लावुन झाल्यावर ती पुर्णपणे विझल्याची खात्री करावी. यासाठी पाण्याचा वापर करावा.
● जळती सिगारेट बेजबाबदारपणे कोठेही टाकू नका.
● कितीही गरजेचे असले तरी दिवसाच्यावेळी आग लावू नये.
● अग्नीशामक दलाला पाचारण करा. (अग्नीशामक दल १८०० २२३ ४३८१,०२३६५२५२०३०.
● वनविभागाची हेल्पलाईन – १९२६ (वंदेमातरम फॉरेस्ट)
● कोठेही आग लागलेली दिसल्यास तात्काळ विझविण्याचा प्रयत्न करा किंवा आग आटोक्यात नसल्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना संपर्क करावा