वादळी वाऱ्यासह पावसामुळे सांगेली गावात दीड कोटींहून अधिक नुकसान

Google search engine
Google search engine

नुकसानग्रस्तांना त्वरित मदत मिळण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा

सांगेली सरपंच लवू भिंगारे यांची मागणी

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथे शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने तब्बल दीड कोटींचे नुकसान झाले आहे. यात पन्नासहून अधिक घरांसह शेतमांगराचा समावेश आहे. तर परिसरातील माड बागायती ही उन्मळून पडली आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आहे.सावंतवाडीचे तहसिलदार अरुण उंडे यांनी नुकसानीची पाहणी केली असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्तांना शासनाकडुन तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी सांगेली सरपंच लवू भिंगारे यांनी केली आहे.सांगेली देवकरवाडी, खालचीवाडी आणि सावंतटेंब आदीवाडीतील घरांचे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. यात शिवराम परब, सखाराम राऊळ, आबा कोचरेकर, उज्वला राणे, अनिल गावडे, यांच्यासह देवकरवाडी येथील गुरूनाथ राऊळ यांच्या दुकानाचे तर रेडीज यांच्या घराचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा महसुल प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी तहसिलदार अरुण उंडे यांनी त्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. यावेळी सरपंच लवू भिंगारे यांच्यासह ग्रामसेवक कांता जाधव, बाळा राऊळ, उमेश राऊळ, पुरूषोत्तम राऊळ, एकनाथ राऊळ, नितीन सांगेलकर, वामन नार्वेकर आदी उपस्थित होते.

शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे गावातील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झाडे उन्मळुन पडल्याने वीज खांब तुटले आहेत. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. तो पुर्ववत करण्यात यावा, अशी मागणी विज कंपनीकडे करण्यात आली आहे. तसेच माड बागायतीच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी कृषी अधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे, प्रशासनाने यासाठी सहकार्य करून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी त्वरित पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी सरपंच लवू भिंगारे यांनी केले.