सावंतवाडी अर्बन बँक टीजेएसबी बँकेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव

बँकेच्या २१ जून रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत होणार निर्णय

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुनी सहकारी संस्था असलेल्या सावंतवाडी अर्बन बँकेच्या विलीनीकरणाबाबत जोरात हालचाली सुरू झाल्या आहेत. आरबीआयने निर्बंध लादल्यानंतर आर्थिक अडचणीत आलेल्या या बँकेचे आता ठाणे येथील टीजेएसबी या सहकारी बँकेत विलीनीकरण होणार आहे. यासंदर्भात टीजेएसबी बँकेची सर्वसाधारण सभा २१ जूनला होणार असून यावेळी विलीनीकरणावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सावंतवाडी अर्बन बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा आहे. या बँकेमध्ये जिल्हाभरातील हजाराहून अधिक सभासद आहेत. सावंतवाडी तालुक्यासह जिल्हाभरात या बँकेने अल्पावधीत चांगली भरारी घेतली होती. परंतु या बँकेवर आरबीआयने आठ महिन्यापूर्वी निर्बंध लादले. त्यामुळे बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आल्यानंतर बँक अडचणीत आली. त्यानंतर संचालक मडळाने बँकेतील प्रत्येक ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यास बँक कटीबद्ध असल्याचे सांगितले होते.

या निर्बंधातून बाहेर पडण्यासाठी असलेल्या सभासदांकडून साडेतीन कोटीचे भाग भांडवल जमा करण्याचा निर्धार करीत दीड कोटीहून अधिक भाग भांडवल जमा केले होते. मात्र, असे असूनही बँकेवरील निर्बंध उठले नाही. त्यामुळे आता बँकेचे विलिनीकरण करण्याच्या हालचाली जोरात सुरू झाल्या आहेत.

ठाणे येथील टीजीएस सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याबाबत नोटीस वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली असून या पार्श्वभूमीवर टी जी एस सहकारी बँकेने २१ जूनला सावंतवाडी अर्बन बँक आणि आणखी अन्य एक बँक टिजीएस बँकेत विलिन करण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे या सभेत दोन्ही बँका विलीनीकरणाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान, याबाबत अर्बन बँकेवरील तज्ञ संचालक तानाजी वाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, टी जी एस बँकेच्या सर्वसाधारण सभेप्रमाणेच अर्बन बँकेची देखील सर्वसाधारण सभा होणार आहे.

या सभेत बँक विलीनीकरण करण्याबाबत निर्णय होऊन तशा प्रकारची नोटीसही प्रसिद्ध देण्यात येणार आहे. ही सभा लवकरच घेण्यात येणार असून जवळपास महिन्याभराच्या कालावधीमध्ये अर्बन बँक विलीनीकरण होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

ठाणे येथील ज्या टीजीएस सहकारी बँक ही सहकारी क्षेत्रात काम करणारी देशभरातील पाचव्या क्रमांकावरील बँक आहे त्यामुळे या ठिकाणी अर्बन बँकेच्या ठेवीदारांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत आहे. सद्यस्थितीत आहे त्याच कर्मचाऱ्यांच्या मार्फत हे काम सुरू होणार आहे त्यानंतर कर्मचारीही नव्याने भरती होणार आहेत एकूणच सहकार क्षेत्रातील चांगल्या सुविधा देणारी बँक या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.