सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील कुणकेरी गावचे सुपुत्र व युवा जादुगार केतनकुमार अर्थात केतन उदय सावंत यांना आर्ट बिटस् फौंडेशन महाराष्ट्रकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय ” युवा कला गौरव ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कला गौरव सिंधुदुर्गमध्ये उत्कृष्ट जादु कला म्हणून हा युवा पुरस्कार केतन सावंत यांना देण्यात आला आहे. आई-वडिलांच्या आशीर्वादाने व माझ्या जादू क्षेत्रातील गुरूंच्या व माझ्या रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने या पुरस्काराचा मानकरी ठरलो असून हा सन्मान मी आनंदाने स्वीकार करत आहे अशी भावना केतन सावंत यांनी यावेळी व्यक्त केली.
कला क्षेत्रात एक युवा कलाकार म्हणून करत असलेल्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट बिटस् फौंडेशन महाराष्ट्र कडून हा राज्यस्तरीय ” युवा कला गौरव ” पुरस्कार २०२२ प्रदान करण्यात आला आहे. भविष्यात कला क्षेत्रात काम करीत असताना आपण सामाजिक जबाबदारीचं भान राखत, नव्या जोमाने उत्तम उत्तम कार्य करीत रहावं, यासाठी हा पुरस्कार आपणास प्रेरणा देईल, अशा शब्दांत आर्ट बिटस् फौंडेशन महाराष्ट्रकडून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
कुणकेरीचे सुपुत्र असलेले युवा जादूगार केतन सावंत हे सावंतवाडी येथे वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत आहेत. या पुरस्काराविषयी बोलताना जादूगार केतन कुमार यांनी सांगितले की ही जादू कला आपण गुजरात, मुंबई, पुणे आदी भागात शिकलो. मात्र,
आपले जादू क्षेत्रातील गुरु हे चिपळूण येथील अवधूत निवतकर असून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण ही कला शिकल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच
आपली जादूची कला आर्ट बिट्स फाउंडेशन पर्यंत दशावतारातील युवा कलाकार गौरव शिर्के यांनी पोहोचविल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आपल्या कलेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक वाढवायचा आहे असेही ते म्हणाले.
केतन कुमार यांचे वडील उदय सावंत हे वारकरी संप्रदायातील असून पंढरपूरचे नित्य वारकरी आहेत. केतन सावंत याच्यावरही वारकरी संप्रदायाचा पगडा असून अलीकडेच डिसेंबर महिन्यात सावंतवाडी येथे झालेल्या वारकरी संप्रदायाच्या महामेळाव्यात केतन सावंत यांना युवा वारकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर प्राप्त झालेल्या युवा कला गौरव पुरस्काराबाबत कुणकेरी गावासह सावंतवाडी तालुक्यात त्यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे.
Sindhudurg