Annual Chaitrotsav celebration of Sri Laxmipallinath Devasthan of Pali concluded
पाली | वार्ताहर : तालुक्यातील पाली-पाथरटचे ग्रामदैवत व कोकणातील प्रसिध्द पालीच्या श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचा वार्षिक चैत्रोत्सव सोहळा नुकताच मंदिरामध्ये उत्साहात व धार्मिक वातावरणात पार पडला.या सोहळ्यासाठी राज्यासह देशविदेशातील भाविकांनी हजेरी लावून, श्रींची सेवा केली. उत्सव काळात दररोज धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती.यावर्षीचा वार्षिक चैत्रोत्सव सोहळा चैत्र शु.११ ते चैत्र वद्य १ शके १९४५ दि. १ ते ७ एप्रिल या कालावधीत संपन्न झाला. यंदाच्या वर्षी चैत्रोत्सवाची सेवा समस्त गुणे परिवार, कोल्हापूर यांनी केली. उत्सव काळात दररोज सकाळी वैयक्तिक पुजा, अभिषेक, एकादष्णी, लघुरूद्र, महारूद्र, यज्ञयागादी कर्मे आदि धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असत. त्यानंतर दुपारी नैवेद्य, आरती व मंत्रपुष्प, रूपे लावणे व धुपारती व आरती, मंत्रपुष्पांजली व नामजप , मंत्रजागर,कीर्तन, पालखी प्रदक्षिणा व छबिना, स्थानिक भजन मंडळांचे भजन, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.
सिद्धयोगी छत्रपती शिवाजी महाराज श्रीमानयोगी (रणजित देसाई) सादरकर्ते सतीश जोशी,मराठीतील प्रख्यात विनोदी ऐकपात्री प्रयोग सादरकर्ते बंडा जोशी, पुणे, नाट्यगीतांचा इंद्रधनू गाणी सादरकर्ते सुनीता गुणे, आसावरी गुणे करमरकर,नारायण गुणे पुणे, जागर मनाचा मनुष्यजन्माचे सार्थक करण्यासाठी सहजसुंदर विचारधारा सादरकर्ते शंतनू गुणे नाशिक,लखलख चांदण संगीतकार वसंत प्रभू, पी सावळाराम यांच्या चित्रपटांची सांगीतिक मेजवानी सादरकर्ते भाग्यश्री मुळे कोल्हापूर, कीर्तनकार ह.भ.प. विश्वनाथबुवा भाटे, उमरे रत्नागिरी, यांचे लळीताचे कीर्तन, श्री लक्ष्मीपल्लीनाथ नाट्यमंडळ, पालीनिर्मित अशोक पाटोळे लिखीत ३ अंकी श्यामची मम्मी या नाटकाचा प्रयोग झाला. यावेळी वार्षिक कार्यक्रम वार्षिक सण,उत्सव व देवस्थानची माहिती उपस्थित भक्तांना देण्यात आली. उत्सव काळात श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थान,पाली व गुणे परिवार कोल्हापूर आणि लायन्स आय हॉस्पिटल रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू तपासणी शिबीर घेण्यात आले त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
सर्व भक्तांनी ग्रामदैवत श्री लक्ष्मी पल्लीनाथ व श्री करंबेळदेव या मंदिरांच्या जीर्णोध्दाराचा १४ वा वर्धापनदिन कार्यक्रम अनुक्रमे दि.३० एप्रिल व १ मे रोजी पाली येथे पार पडणार आहे यासह सर्व वार्षिक धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थानचे मुख्य मानकरी व अध्यक्ष संतोष नारायण सावंतदेसाई यांनी केले आहे.