मुळदे कोकण कृषी विद्यापीठाला मनसेचा घेराव

स्थानिक कामगारांच्या रोजंदारी प्रश्नावरून मनसे आक्रमक

कुडाळ । प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ मुळदे केंद्रात धडक देत घेराओ घालण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.
मुळदे गावातील रहिवाशी कामगारांच्या जमिनी कृषी केंद्रासाठी घेण्यात आल्या आहेत. परंतु त्या कामगारांना कायमस्वरूपी सामावून घेण्यात आले नाही. हे कामगार लाल मस्टर अंतर्गत कार्यरत होते. परंतु त्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता लाल मस्टर बंद करून रोजंदारी स्वरूपात समाविष्ट करण्यात आले. मुळदे कृषी केंद्रात काही कामगार २५ ते ३० वर्ष कार्यरत असून त्यांना कोणत्याही प्रकारची कामे करतानाची सुरक्षा साधने दिली जात नसून कामगारांना काम करताना कोणतीही इजा झाल्यास विद्यापीठाकडून उपचारासाठी कोणतेही वैद्यकीय सेवा उपलब्ध केली जात नाही. यामुळे असंख्य कामगार हतबल झालेले आहेत, अशी माहिती मनसेच्या वतीने देण्यात आली.

सदर कामगार रविवारी मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांच्याकडे तक्रार घेऊन आले व त्याची तात्काळ दखल घेत सोमवारी मनसेच्या शिष्टमंडळाने मुळदे येथील बाळासाहेब कृषी केंद्र कॉलेजला धडक दिली व कॉलेजचे असोसिएट डिन डॉ. प्रदीप हळदवणेकर यांची भेट घेत लेखी निवेदन सादर केले. यावेळी सविस्तर याविषयी चर्चाही करण्यात आली. यावेळी मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार म न.वि.से माजी जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ म.न.वि.से कुडाळ तालुका संपर्क अध्यक्ष सर्वेश सावंत प्रवीण गवस निलेश देसाई सिद्धेश माळकर तसेच ग्रामस्थ व कामगार उपस्थित होते.यानंतर व्यवस्थापक श्री. हळदवणेकर यांनी निवेदनाच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करू व एक संयुक्तिक बैठक आयोजित करून यावर तोडगा काढू असे चर्चेदरम्यान ठरले. तसेच कामगारांना लागणारे साहित्य आपण संस्थेच्या माध्यमातून पुरवू असे आश्वासन देण्यात आले यावेळी मनसे पदाधिकारी कामगार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते