Gogte Joglekar College concluded ‘Cinema Taste Camp’
रत्नागिरी : रत्नागिरी फिल्म सोसायटी, गोगटे जोगळेकर महाविद्यालय फिल्म क्लब आणि एस. बी. कीर लॉ कॉलेज फिल्म क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथील ज. शं. केळकर सेमिनार हॉल, रत्नागिरी येथे दि. ८ आणि ९ एप्रिल रोजी – ‘न्यू व्हिजन २०२३’ हे दोन दिवसीय चित्रपट रसस्वाद शिबिर पार पडले. या कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी रत्नागिरी फिल्म सोसायटी चे पदाधिकारी डॉ. नितीन चव्हाण, श्री सुधीर मुळ्ये तसेच गोगटे कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, एस. बी. कीर लॉ कॉलेज च्या प्राचार्या सौ. तृप्ती देवरुखकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. बी. कीर लॉ कॉलेजच्या सहयोगी प्राध्यापिका सौ संयोगिता सासने यांनी केले. प्रमुख वक्त्यांची ओळख ही एस .बी. कीर कॉलेजचे सहयोगी प्राध्यापक आशिष बर्वे यांनी करून दिली.
या कार्यशाळेसाठी या क्षेत्रातले तज्ज्ञ श्री. सुहास किर्लोस्कर यांनी मार्गदर्शन केले. एकूण दोन दिवसाच्या या कार्यशाळेमध्ये सकाळच्या सेशन मध्ये चित्रपटांचे प्रकार, संगीताचे नेमके कार्य काय, चित्रपटाची कथा नेमकी दोन ते तीन वाक्यात कशी सांगावी याबद्दल चर्चा केली आणि त्यामुळे कथा,पटकथा, संवाद हे त्या पुढचे टप्पे कसे तयार केले जातात व चित्रपट कसा तयार होतो, याबाबत अगदी विश्लेषणपूर्वक मार्गदर्शन केले गेले. तसेच वेगवेगळ्या आवाजाची निर्मिती कशी केली जाते या बाबत ही उत्तम माहिती दिली गेली. तसेच उच्च दर्जाचा चोंदखळ प्रेक्षक उच्च दर्जाच्या चित्रपटाची निर्मितीस कसा आवश्यक असतो हे ही सांगितले. प्रेक्षकाने चित्रपट पहाताना त्यातील बारीक सारीक गोष्टींकडे लक्षपूर्वक बघणे आणि ऐकणे आवश्यक आहे. हा या कार्यशाळेचा महत्त्वाचा उद्देश होता.
दुपारच्या सत्रामध्ये दि. ८ रोजी ‘देऊळ’ हा मराठी चित्रपट दाखवण्यात आला तर दि. ९ रोजी ‘जॉनी गद्दार’हा सस्पेंस, थ्रिलर चित्रपट दाखवण्यात आला. या दोन्ही चित्रपटानंतर एकूण कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, साऊंड चित्रपटातील रंग याविषयी चर्चा घेण्यात आली. सर्व प्रेक्षक त्यात उस्फुर्तपणे सहभागी झाले होते. या कार्यशाळेमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थी, एस. बी. कीर लॉ कॉलजचे विद्यार्थी तसेच रत्नागिरी फिल्म सोसायटीचे मेंबर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. निधी पटवर्धन यांनी केले.