खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील बहिरवली विभागात भर पावसातही ड्रेझरच्या माध्यमातून रात्रं-दिवस विनापरवाना वाळू उपसा होत आहे. यामुळे खाडीपट्ट्यातील मार्गाची दुरावस्था होत असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. राजरोसपणे वाळू उत्खनन सुरू असतानाही महसूल खात्याकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा सूर खाडीपट्ट्यातील ग्रामस्थांकडून आळवला जात आहे.
खाडीपट्ट्यात कुठल्याही प्रकारचे शासनाला स्वामित्व धन जमा न करता ड्रेझरच्या माध्यमातून वाळू उत्खनन करण्यासाठी नेमकी परवानगी कोणी दिली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिवस- असणाऱ्या वाळू रात्र सुरू उत्खननाचा नजीकच्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
ड्रेझरद्वारे करण्यात आलेल्या वाळूचे ठिकठिकाणी साठेही करण्यात आले असून हे महसूलच्या निदर्शनास येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाळू वाहतुकीचे डम्पर खेड- बहिरवली-संगलट मार्गावरून धावत आहे. यामुळे मार्गाची दुरावस्था होत आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी बिकट बनला असून वाहनचालकांची कसरत सुरू आहे.
बहिरवली -संगलट मार्गावरून दररोज डम्परच्या १५० हून अधिक फेऱ्या धावत असल्याचे खाडीपट्ट्यातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाळूचे ड्रेझर बहिरवली व चिपळूण- खाडीच्या हद्दीलगत असून महसूल विभागाला या बाबत माहिती असून देखील कारवाईकडे दुर्लक्षच केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याची जिल्हा प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन कारवाईची मागणी केली जात आहे.