कळसवली येथे आरएचपी फाउंडेशनतर्फे दिव्यांगांसाठी शिबिर

Camp for differently abled by RHP Foundation at Kalasvali

राजापूर | प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्य राजेश पांचाळ आणि सामाजिक कार्यकर्त्या स्वरा पांचाळ (वडवली) यांच्या सहकार्याने दिव्यांगांसाठी शिबिर आयोजित केले. यात रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे दिव्यांगांना मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये कळसवली, वडवली, चुनाकोळवण, शिवणे बुद्रुक, वडदहसोळ या पाच ग्रामपंचायतीमधील दिव्यांग, पालक आणि ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला.

या शिबीरामध्ये आरएचपी फाउंडेशनचे सदस्य समीर नाकाडे यांनी दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र कसे काढावयाचे, त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती, युनिक आयडी कसे काढायचे, एसटी पास, रेल्वे पास काढण्याबद्दलची माहिती दिली. तसेच दिव्यांगांचे कायदे, ग्रामपंचायत ५ टक्के निधी, जिल्हा परिषद निधी, समाजकल्याण निधी, दिव्यांगांना शासनाकडून मिळणारी पेंन्शन, कृत्रिम साधने याविषयी सखोल व परिपूर्ण माहिती दिली.

आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे यांनी दिव्यांगांचे २१ प्रकार आणि त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दिव्यांग बांधव आणी पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या शिबीराचा लाभ घेतला. या शिबीरासाठी आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे, समिता कुळये उपस्थित होते. कळसवलीचे सरपंच देवेश तळेकर, सदस्य दिप्ती शेडेकर, राजेश पांचाळ, वैभव ठाकुरदेसाई, चुनाकोळवणचे सरपंच श्रीकांत मठकर, सदस्य अंकिता चव्हाण, श्रुतिका तरळ, वडदहसोळचे सरपंच विजय घाडये, ग्रामसेवक सुप्रिया भासये आदी मान्यवर उपस्थित होते.