आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात प्रशासकीय अधिकारी सत्यवान रेडकर यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न

In Athalye-Sapre-Pitre College, Administrative Officer Satyawan Redkar delivered a lecture on competitive examination guidance

संगमेश्वर तालुक्यातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी, तसेच कोंकणातून जास्तीत जास्त प्रशासकीय व बँकिंग अधिकारी तयार व्हावेत याकरिता भारत सरकारच्या मुंबई येथील सीमाशुल्क विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी या पदावर कार्यरत असलेले कोकणचे सुपुत्र सत्यवान रेडकर यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात करण्यात आले होते.
श्री. सत्यवान रेडकर यांनी मार्गदर्शन करताना आपला संघर्षमय प्रवास सांगताना एक नववी नापास झालेला विद्यार्थी ते सात पदव्युतर शैक्षणिक अहर्ता प्राप्त असलेला ध्येयवेडा अधिकारी म्हणून त्यांनी आपला प्रवास कथन केला. विद्यार्थ्यांना प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी आवश्यक असलेल्या UPSC, MPSC, SSC, NDA, Banking, Stenographer, Multi-tasking staff, पोलीस भरती अशा विविध स्पर्धा परीक्षांची माहिती देऊन या स्पर्धा परीक्षांची तयारी कशाप्रकारे करावी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

श्री.सत्यवान रेडकर यांचे हे १७४वे मोफत मार्गदर्शनपर व्याख्यान होते. या मार्गदर्शन व्याख्यानाकरिता संगमेश्वर तालुक्यातील शाळा व महाविद्यालयातील एकूण १७० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व पालक सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विकास शृंगारे यांनी केले, तर मार्गदर्शकांचा परिचय प्रा. धनंजय दळवी यांनी करून दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या हस्ते प्रशासकीय अधिकारी सत्यवान रेडकर यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी केले. या कार्यक्रमाकरिता स्पर्धा परीक्षा समिती सदस्य प्रा. विकास शृंगारे, प्रसिध्दी प्रमुख प्रा. धनंजय दळवी, स्पर्धा परीक्षा समन्वयक ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, प्रा. अनिकेत ढावरे, प्रा. डॉ. हेमंत चव्हाण, प्रा. स्नेहलता पुजारी, ग्रंथालय सहाय्यक स्वप्नील कांगणे, रोशन गोरुले, विश्वास जठार यांचे सहकार्य लाभले.
फोटो- १. श्री. रेडकर यांचा सन्मान करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. पाटील आणि श्री. आर्ते.
२. व्याख्यानासाठी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व पालक.
छाया- प्रा. धनंजय दळवी.