Various programs including rally on the occasion of Mahatma Jotiba Phule Jayanti
रत्नागिरी : सामाजिक न्याय समता पर्व अभियान सुरु असल्याने स्त्री शिक्षणाचे प्रणेते व थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकल्याण कार्यालय रत्नागिरी येथे आज मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरूवात रॅली काढून करण्यात आली. रॅलीची सुरूवात सकाळी 10.00 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतीगृह कुवारबाव रत्नागिरी येथून करण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण रत्नागिरी यादव गायकवाड , सहाय्यक लेखा अधिकारी डी. डी. केळकर, , वरीष्ठ समाजकल्याण निरीक्षक श्रीम. मोरे आदी कार्यालय कर्मचारी आणि वसतीगृहातील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी यादव गायकवाड यांनी सामाजिक न्याय समता पर्व अभियान व महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या रॅलीचा उद्देश विद्यार्थ्यांना सांगितला. महात्मा फुले यांचे स्त्री शिक्षणातील कार्य आणि त्यांनी स्त्रीयांना दिलेला सन्मान लक्षात घेऊन रॅली नवीन 100 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह टी. आर. पी. रत्नागिरी येथे नेण्यात आली. तेथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून सर्व मुलींना रॅलीमध्ये सहभागी करून घेण्यात आले. त्यानंतर महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी थोर नेत्यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत रॅली सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, रत्नागिरी येथे. आल्यानंतर समाप्त करण्यात आली.
यांनतर कार्यालयाच्या हॉल मध्ये महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. योवळी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. रत्नागिरी कीर्ती किरण पुजार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण रत्नागिरी यादव गायकवाड, गट विकास अधिकारी, पं.स. रत्नागिरी, जे. पी. जाधव आदि मान्यंवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी आपल्या मनोगतपर भाषणात महात्मा जोतिबा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याचे वर्णन केले. या महान व्यक्तींचा आदर्श घेऊन आपण आपले जीवन जगले पाहीजे, जे इच्छित आहे ते सर्व कठोर प्रयत्न करून मिळविले पाहीजे असे सांगितले. युवा पिढीने आपली स्वप्ने कशी पूर्ण करावी याविषयी त्यानी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानात स्त्रीयांच्या शैक्षणिक व सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी महात्मा फुलेंचे कार्य विस्तृतपणे मांडले.
सामाजिक न्याय समता पर्व व महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त समाजकल्याण विभागामार्फत
रत्नागिरीतील विविध महाविद्यालये आणि शासकिय वसतीगृहांमध्ये महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या कार्यावर आधारीत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सामुहीक रांगोळी स्पर्धा, एकांकिका स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामधील पहिले तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.प्रास्ताविकामध्ये सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.