आसमंत फाउंडेशनतर्फे तीन संस्थांना दीड लाखांची मदत

1.5 lakh aid to three organizations by Asmant Foundation

रत्नागिरी : येथील आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन या पर्यावरण, शास्त्रीय संगीत आणि विद्यार्थ्यांसाठी कार्यरत संस्थेने पुणे येथील तीन सामाजिक संस्थांना प्रत्येकी ५०,००१ रुपयांची देणगी नुकतीच एनईएफटीद्वारे सुपूर्द केली.भोर येथील आधारवड वानप्रस्थाश्रम, पुण्यातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर गुरुकुल आणि पुण्यातीलच केळकर काका फाऊंडेशन या तीन संस्थांच्या बॅंक खात्यामध्ये ही रक्कम मदत म्हणून हस्तांतरित करण्यात आली. याबद्दल तिन्ही संस्थांनी आसमंत फाउंडेशनचे आणि नंदकुमार पटवर्धन यांचे विशेष आभार मानले आहेत. तीन संस्थांना मिळून एकूण १ लाख ५० हजार ३ रुपयांची ही मदत नुकतीच देण्यात आली. या मदतीकरिता आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनचे संचालक पुरुषोत्तम पेंडसे यांचे विशेष सहकार्य लाभले.

आसमंत फाउंडेशनने रत्नागिरी एमआयडीसीमध्ये सहा एकरचा प्लॉट विकसित करताना येथे जंगल निर्मिती केली आहे. याच ठिकाणी वनस्पती उद्यान, तलाव निर्मिती केली आहे. या उद्यानात अभ्यास करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी येत असतात. आसमंत फाउंडेशनतर्फे अलीकडेच रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला सागर महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पर्यावरण, निसर्ग संवर्धनाच्या कामात नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवताना आसमंत फाउंडेशनला समाजातील विविध घटकांची मदत मिळू लागली आहे. याबरोबरच आपण समाजाचे काही देणे लागतो या हेतूने आसमंतने भोर येथील वानप्रस्थाश्रम, स्वा. सावरकर गुरुकुल आणि केळकर काका फाउंडेशन यांचे कार्य पाहून त्यांना निस्वार्थीपणे मदत केली. या तिन्ही संस्थांचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे. अशा संस्थांना मदतीची गरज लक्षात घेऊन आसमंतने निधी देऊ केला.