पाटपन्हाळे | वार्ताहर : आजवर शेकडो ठिकाणी शासकीय स्पर्धा परीक्षा व करिअर संदर्भात व्याख्याने देणारे, संपूर्ण कोकण तसेच महाराष्ट्रात आपल्या शैक्षणिक व्याख्यानांनी जनजागृती करणारे, कोकणात शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव निर्माण करण्यासाठी अविरतपणे शैक्षणिक ज्ञानदान करणारे, कोकण भूमिपुत्र, तसेच मुंबई सीमाशुल्क (भारत सरकार) कनिष्ठ अनुवाद अधिकारी मा. सत्यवान यशवंत रेडकर यांचे अमूल्य मार्गदर्शन गुहागर मधील विद्यार्थ्यांना, युवक- युवतींना लाभले. उत्तम शिक्षण हे आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. आपले जीवन समृद्ध अधिक गतिमान होण्यासाठी तरुणांना स्पर्धा परीक्षा तसेच करिअर आणि व्यवसायिक विषयी मार्गदर्शन होणे काळाची गरज आहे. हीच काळाची गरज ओळखून गुहागर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संयोजक प्रशांत भेकरे, संतोष गावडे, दिनेश कदम, महेश शिगवण यांच्या माध्यमातून पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शासकीय स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिभा आहे.
येथील विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली, तर कोकणच्या मातीतून अनेक प्रशासकीय अधिकारी निर्माण होतील. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा द्याव्यात. स्पर्धा परीक्षांबद्दल असलेला न्यूनगंड दूर करून आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास आपले गाव हे प्रशासकीय अधिका-यांचे गाव होण्यास वेळ लागणार नाही. भविष्यातील सरकारी अधिकारी घडविण्यासाठी ही एक शैक्षणिक चळवळ आहे. गुहागर तालुक्यातील सर्व विद्यार्थी, युवक-युवतीनी त्याचा लाभ घेऊन कालानुरूप आपल्या जीवनात आमूलाग्र बदल करून यशस्वी व्हावे, असे आवाहन सत्यवान रेडकर यांनी केले.या व्याख्यानाला पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असिमभाई साल्हे, सामाजिक कार्यकर्ते व या व्याख्यानाचे संयोजक प्रशांत भेकरे, संतोष गावडे, दिनेश कदम, महेश शिगवण, शिक्षक मनोज शिंदे, बाबासाहेब राशिनकर, संदीप वाघे, प्रा.वासनिक व पालक बंधुभगिनींनी, विद्यार्थी, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते