कार्यशील सरपंच म्हणून मंगेश सोलकर यांची निवड

Selection of Mangesh Solkar as Working Sarpanch

पत्रकार संघातर्फे यावर्षीपासून सरपंचांचा होणार सन्मान

गुहागर | प्रतिनिधी : नीमकर कुटुंबिय व गुहागर तालुका पत्रकार संघाने यावर्षीपासून स्व. वासुदेव नीमकर कार्यशील सरपंच पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. पहिल्या पुरस्कारासाठी खामशेत ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश तानाजी सोलकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

यावर्षीपासून गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे स्व. वासुदेव निमकर यांच्या नावाने गुहागर तालुक्यात उत्तम काम करणाऱ्या सरपंचाला पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. कै. वासुदेव निमकर यांच्या कुटुंबीयांनी यासाठी पत्रकार संघाला मदत केली आहे. वासुदेव निमकर हे आवरे असोरे ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून 39 वर्ष (1962 ते 1996) सरपंच होते. या कालावधीत अनेक वेळा ते बीनविरोध निवडून आले. 1962 मध्ये पंचायत समितीची स्थापना झाल्यानंतर पहिले उपसभापती बनण्याचा मानही त्यांना मिळाला होता. 1962 ते 1977 मध्ये ते पंचायत समिती सदस्य होते. 1977 ते 1991 पंचायत समितीचा कारभार प्रशासनाकडे होता. त्यानंतर 1992 ते 1996 वासुदेव निमकर पंचायत समितीचे स्विकृत सदस्य होते. त्या काळात तालुका खरेदी विक्री संघाचा चेअरमन हा पंचायत समितीचा स्विकृत सदस्य होता. त्यांनी लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे संस्थापक संचालक म्हणूनही काम केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच दक्षिण गुहागरमधील अनेक रस्त्यांची कामे मार्गी लागली. आबलोलीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या कार्याची प्रेरणा तालुक्यातील सरपंचांना मिळावी म्हणून नीमकर कुटुंबिय आणि गुहागर तालुका पत्रकार संघाने यावर्षी पासुन कार्यशील सरपंच पुरस्कार देण्याचे निश्चित केले.

पुरस्कारासाठी सन 2021-22 हा कालावधी निश्चित करण्यात आला. 3 ग्रामसेवक आणि पत्रकार संघाचे 2 सदस्यांची निवड समिती तयार करण्यात आली. या निवड समितीसमोर सुरवातीला तालुक्यातील 5 सरपंचांची नावे होती. कोणताही प्रस्ताव न मागवता वेगवेगळ्या मार्गांनी सरपंचांची माहिती संकलीत केल्यानंतर अखेरच्या क्षणी दोन सरपंचांमध्ये चुरस निर्माण झाली होती. त्यातून खामशेतचे सरपंच मंगेश तानाजी सोलकर यांचे नाव स्व. वासुदेव निमकर कार्यशील सरपंच या पुरस्कारासाठी निश्चित करण्यात आले. गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे 15 एप्रिलला जाहीर कार्यक्रमात हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे.